दिल्लीतील 11 जणांच्या मृत्यूचं कारण आलं समोर, 2 रजिस्टरमध्ये खुलासा

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण आलं समोर

Updated: Jul 2, 2018, 05:23 PM IST
दिल्लीतील 11 जणांच्या मृत्यूचं कारण आलं समोर, 2 रजिस्टरमध्ये खुलासा title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील बुराडी येथील एकाच परिवारातील 11 जणांचे मृतदेह घरात सापडल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती. हत्या की आत्महत्या याबाबत अजूनही चर्चा सुरु आहेत. 11 लोकांच्या रहस्यमयी मृत्यूने अनेकांना धक्का बसला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत पण हाती अजून काहीच लागलेलं नाही. यातच 6 जणांचं पोस्टमॉर्टम पूर्ण झालं आहे. पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार रिपोर्टमध्ये मृत्यू हा लटकल्यामुळे झाल्याचं सांगण्यात आलं आहे. मृतदेहावर कोणतीही जबरदस्ती केलेली दिसत नाही. या घरातून 2 रजिस्टर मिळाले आहे ज्यामुळे हे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचं होत चाललं आहे. या दोन रजिस्टरमध्ये तंत्र-मंत्र आणि अंधविश्वासाच्या गोष्टी समोर आल्य़ा आहेत.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आलं समोर

संयुक्त पोलीस आयुक्त (क्राईम ब्रांच) आलोक कुमार यांनी सांगितलं की, 11 व्यक्तींपैकी 6 मृतदेहांचे पोस्टमॉर्टम पूर्ण झाले आहे. 2 मुलं, 2 मुली आणि आईचं पोस्टमॉर्टम पूर्ण झालं आहे. 'पोस्टमॉर्टममध्ये लटकल्य़ामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. गळ्य़ाला फास लावल्याचा किंवा त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा कोणताही प्रकार दिसत नाही. दिल्लीतील बुराडीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रजिस्टरमध्ये लिहिलेल्या पानांना जेव्हा वाचलं गेलं तेव्हा त्यात लिहिलं होतं की, मोक्ष मिळण्यासाठी जीवन त्याग केलं पाहिजे. या प्रक्रियेत त्रास होईल. कष्टापासून मुक्ती मिळण्यासाठी डोळे, कान बंद करावे लागतील. रजिस्टरमध्ये असं देखील लिहिलं आहे की, व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या कपड्याने लटकायचं आहे. उदाहरण म्हणून ओढणी किंवा साडीचा उल्लेख आहे. यामध्ये वटवृक्षाच्या पूजेचा देखील उल्लेख आहे. पण पोलीस अजूनही वेगवेगळ्या मृत्यूच्या शक्यता पडताळून पाहत आहे.

26 जूनला रजिस्टरमध्ये काय लिहिलं

पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार रजिस्टरमध्ये सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. पहिल्यांदा नोव्हंबर 2017 मध्ये यामध्ये नोंद झाली आणि शेवटची नोंद 26 जून 2018 ला झाली. 30 जूनला देवाला भेटायचं आहे. मोक्ष मिळण्याठीची साधना रात्री 1 वाजता सुरु करायची. पोलिसांना अशी शंका आहे की, सुरुवातील परिवारातील काही जणांनी याची योजना केली आणि मग सर्व कुटुंबाला यामध्ये सहभागी केलं.