मुंबई : आपल्याकडे रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटलं जातं. रक्तदान केल्याने दुसऱ्याला जीवदान मिळतंच पण त्याचे आपल्या शरीरालाही फायदे होत असतात. तुम्ही जर रक्तदान करत नसला किंवा तुम्हाला भीती वाटत असेल तर हे फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही रक्तदान करण्याचा नक्की विचार कराल.
रक्तदान करण्याप्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी 14 जून रोजी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो. या दिवशी रक्तदानाचं महत्त्व आणि त्याचे फायदे लोकांना समजवून सांगितले जातात. याशिवाय रक्तदान का महत्त्वाचं हे देखील लोकांना समजवलं जातं. या दिवशी रक्तदान करणाऱ्यांच्या मनातील भीती दूर केली जाते.
वाढणारं वजन हे नेहमी आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतं. रक्तदान, हेल्दी आहार आणि व्यायाम यामुळे वजन वाढण्यावर नियंत्रण येतं. याशिवाय वेळोवेळी रक्तदान केल्याने शरीरातील रक्तही वाढतं असं म्हटलं जातं.
शरीरात लोहाचे प्रमाण जास्त असेल तर हृदयविकाराचा धोका वाढतो. रक्तदान केल्याने तुमच्या शरीरात लोह संतुलित राहतं. त्यामुळे हृदयविकाराचा धोका आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.
रक्तदान करताना तुमच्या काही चाचण्या होतात. त्यामुळे वेळोवेळी तुमची तपासणीही होते. त्यामुळे कोणते आजार किंवा त्रास असल्याचं समजतं. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्तदान केल्याने मानसिक स्वास्थ उत्तम राहातं. तुम्ही सकारात्मक विचार करायला लागता.
देण्याची वृत्ती असणारा माणूस नेहमी सकारात्मकतेनं आणि चांगल्या मनाने देतो. त्यामुळे रक्तदानही अशाच चांगल्या मनाने हेतूनं केलं जातं. त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावरही चांगला परिणाम होत असतो.