हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅकमध्ये नेमका फरक काय? जास्त धोका कशात असतो?

हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक यांत्यातील फरक ओळखणं तसं थोडं कठीणच आहे. याचं कारण दोघांची लक्ष जवळपास एकसारखीच आहेत. जास्त तणाव आणि चिंता ही पॅनिक अटॅकची प्रमुख कारणं आहेत. ज्यामुळे ह्रदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.   

शिवराज यादव | Updated: Aug 15, 2023, 04:39 PM IST
हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅकमध्ये नेमका फरक काय? जास्त धोका कशात असतो? title=

Difference Between Heart Attack and Panic Attack: आजकाल आपली जीवनशैली इतकी बदलली आहे की त्याच्यासह अनेक आजारही बळावले आहेत. गेल्या काही वर्षांपासून तर हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. यापूर्वी वय झालेल्या लोकांनाच ह्रदयविकाराचे झटके येत असत आणि त्यात त्यांना आपला जीव गमवावा लागत असे. पण आता तर लहान मुलांनाही हार्ट अटॅकचा त्रास जाणवत आहे. दरम्यान हार्ट अटॅकसह पॅनिक अटॅकची समस्याही वाढू लागली आहे. 

वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हार्ट अटॅक जितका धोकादायक असतो तितकाच पॅनिक अटॅकही धोकादायक आहे. अनेकदा लोकांना हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक यामधील फरक कळत नाही. ज्यामुळे त्या रुग्णाला आपल्याला नेमकं काय होत आहे हे समजत नाही. जर तुम्हालाही हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक यातील फरक ओळखताना त्रास होत असेल तर मग समजून घ्या...

हार्ट अटॅक म्हणजे काय?

जेव्हा व्यक्तीच्या ह्रदयापर्यंत रक्त पोहोचवणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो किंवा धमन्या 100 टक्के ब्लॉक होतात तेव्हा त्या स्थितीत व्यक्तीला हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅकही येण्याआधी व्यक्तीला अनेक लक्षणं जाणवतात. ज्यामध्ये छातीत दुखणं, किंवा छाती जड वाटणे ही सर्वात सामान्य लक्षणं आहेत. याशिवाय श्वासोच्छवासात त्रास, घाम येणं, उलटी होणं हीदेखील सामान्य लक्षणं आहेत. ही लक्षणं तात्काळ किंवा काही तासाने दिसतात. 

पॅनिक अटॅक म्हणजे काय?

तज्ज्ञांनुसार, पॅनिक अटॅक म्हणजे एक प्रकारची चिंता असते. ही फार गंभीर स्थिती असून कधी कधी अचानक विकसित होते. पॅनिक अटॅक  आल्यानंतर ह्रद्याची धडधड वाढते तसंच श्वास घेताना त्रास होणं, डोकं गरगरणं आणि शरीर थरथरणं अशी लक्षणं दिसतात. 

समान लक्षणं?

रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅकमध्ये दोन्ही ठिकाणी छातीत दुखणं, श्वास घेताना त्रास आणि घाम येणं अशी लक्षणं दिसतात. 

हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅकमध्ये अंतर

ब्रिटनच्या आरोग्य तज्ज्ञांनी आपल्या रिपोर्टमध्ये दोन्हीमधील मुख्य अंतर सांगितलं आहे की, पॅनिक अटॅक कोणत्याही वेळी येऊ शकतो. मग तुम्ही आराम करत असा किंवा झोपलेले असा. तर हार्ट अटॅक तेव्हा येतो जेव्हा आपण भरपूर काम करत असतो. हार्ट अटॅक फक्त छातीपर्यंत थांबत नाही, तर अनेक लोकांच्या हात आणि मानेपर्यंतही पोहोचतो. 

स्वत:चा बचाव कसा करायचा?

जर तुमच्या छातीत अचानक दुखू लागलं असेल आणि 2 ते 3 मिनिटांपेत्रा जास्त काळ झाला असेल, तसंच शरिरात इतर ठिकाणीही वेदना होत असतील तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. हार्ट अटॅक आल्यानंतर थोडासाही उशीर जीवघेणा ठरतो. जर तुम्हाला वारंवार पॅनिक अटॅक येत असेल तर योग्य उपचार घ्या. लक्षणं नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला औषधंही दिली जाऊ शकतात.