अमित शाहांना सोडणार नाही, त्यांचा समाचार घेणार; उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून दिला इशारा

Uddhav Thackeray Mumbai Rally: जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो हे भविष्यात दिसेल अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना इशारा दिला आहे. औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शाह किस झाड की पत्ती आहे असंही ते म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jan 23, 2025, 09:07 PM IST
अमित शाहांना सोडणार नाही, त्यांचा समाचार घेणार; उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून दिला इशारा title=

Uddhav Thackeray Mumbai Rally: जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो हे भविष्यात दिसेल अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना इशारा दिला आहे. औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शाह किस झाड की पत्ती आहे असंही ते म्हणाले आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये या मेळाव्यात ते बोलत होते. 

"निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदा आपण भेटत आहोत. हिंदूह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आपण षणमुखानंद हॉलमध्ये करणार होतो. पण दोन महिन्यांपूर्वी जो काही निकाल लागला तो मला पटला नाही. मधे अब्दाली म्हणजे अमित शाह इथे येऊन गेले. त्यांनी महाराष्ट्रातील हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे असं म्हटलं. अमित शाहजी जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो हे भविष्यात दिसेल. मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शाह किस झाड की पत्ती आहे," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे. 

"माझ्यासोबत आहे तरी कोण हे कळू द्या यासाठी मी ही जाहीर सभा घेतली. अमित शाह तुम्ही माझी जागा ठरवू शकत नाही. माझी जागा ठरवणारी ही माझी अस्सल शिवसेनाप्रमुखांनी दिलेली वडिलोपार्जित संपत्ती आहे. जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात, तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. गद्दारांनी किती वार केले तरी उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांनी गाढूनच मी संपेन. ज्या दिवशी माझा एकही निष्ठावंत शिवसैनिक म्हणेल, उद्धव तू बाळासाहेबांचे विचार सोडलेस बाजूला हो. त्याक्षणी मुख्यमंत्रीपद सोडलं त्याप्रमाणे पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

"ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मला कुटुंबातील सदस्य, प्रमुख मानतो. तो महाराष्ट्र, मुंबईकर इतक्या निर्दयीपणे माझ्याशी वागणार नाही. विजय पराभव होत असतो. पण जसा पराभव धक्का देणारा आहे, तसा विजय भाजपाच्या अनेक लोकांना पचत नाही आहे. काहीतरी गडबड घोटाळा नक्की झाला आहे. ईव्हीएमचा तर नक्की आहे. ज्या अमित शाह यांनी सरकारी यंत्रणा वापरुन अडीच वर्षं आपल्या महाराष्ट्रावर घटनाबाह्य सरकार लादलं, ते महाराष्ट्र सुटू देतील. एक तर महाराष्ट्राने मोदींच्या गाढव लोकसभेत ज्या पद्धतीने अडवलं तो वार अजूनही वर्मी बसला आहे. महाराष्ट्र जाईल तेव्हा दिल्ली कोलमडेल हे त्यांना माहिती होतं. जर महाराष्ट्राचा निकाल जनतेच्या मनासारखा लागला असता, तर दिल्लीतील सरकार कोलमडलेलं दिसलं असतं," असा दावा त्यांनी केली. 

"अमित शाह यांचा समाचार घेतो. उद्या परत येणार आहेत. काल काय बोलले त्याचा आज आणि उद्या काय बोलतील त्याचा परवा समाचार घेणार. पण समाचार घेणार, मी नाही सोडत. मिठी मारु तर प्रेमाने मारु, पण पाठीत वार केल्यावर वाघनखं काढू. हा महाराष्ट्र आहे आणि ही महाराजांची शिकवण आहे," असा इशारा त्यांनी दिला.