मुंबई : कोरोनाची तिसरी लाट मुंबईच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं जातंय. पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णांचे प्रमाण वाढलं आहे. असं असताना सरकार नियम आणखी कडक करणार आहे. या सगळ्याचा फटका पुन्हा एकदा बॉलिवूडला पडणार आहे.
आता कुठे गोष्टी पुर्वपदावर येत होत्या. असं असताना बॉलिवूडमधील सिनेमाने आपली रिलीज डेट पुढे ढकलली आहे. गेल्या काही दिवसांपासून 'जर्सी' सिनेमाची चर्चा होती. कलाकार शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूरने काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं प्रमोशन सुरू केलं होतं.
ख्रिसमस आणि आता त्या पाठोपाठ थर्टी फर्स्टची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. नागरिक नियम बाजूला सारून सेलिब्रेशन करताना दिसत आहे. यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे.
'जर्सी' चित्रपटाच्या निर्मात्यांना वाटत होते की, आधीच थंड असलेल्या त्यांच्या चित्रपटाचे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आणखी नुकसान होऊ शकते. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. या चित्रपटाची फारशी चर्चा न झाल्यामुळे हा चित्रपट आता थेट ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो, अशीही चर्चा होती.
मात्र निर्मात्यांनी अद्याप काही अधिकृत माहिती दिलेली नाही. 'जर्सी' हा चित्रपट एका क्रिकेटपटूची काल्पनिक कथा आहे, जो त्याच्या कारकिर्दीच्या शिखराच्या दिवसांमध्ये आपल्या रागामुळे आपले करियर उद्ध्वस्त करतो. नंतर आपल्या मुलाचीही क्रिकेटमध्ये असलेली आवड पाहून तो मैदानात परतण्याचा निर्णय घेतो.
चित्रपट शोकांतिका असून चित्रपटाची संपूर्ण कथा या मुलाच्या दृष्टीकोनातून सांगण्यात आली आहे. हा सिनेमा दक्षिण भारतीय चित्रपटाचा रिमेक आहे आणि तिथे नानी या स्टारमुळे हा चित्रपट खूप गाजला.