महाकुंभ मेळ्यात झळकणार 'हे' सेलिब्रटी, जाणून घ्या कोणत्या तारखेला कोणाचा परफॉर्मन्स

MahaKumbh 2025 update: महाकुंभ 2025 ला 13 जानेवारीच्या प्रथम पौर्णिमेपासून सुरुवात होणार आहे. या भव्य धार्मिक सोहळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने देशभरातील लोकप्रिय कलाकारांना परफॉर्म करण्यासाठी निमंत्रित केले आहे. जाणून घ्या महाकुंभ 2025 मध्ये कोणते सेलिब्रिटी परफॉर्म करणार आहेत.

Updated: Jan 11, 2025, 04:33 PM IST
महाकुंभ मेळ्यात झळकणार 'हे' सेलिब्रटी, जाणून घ्या कोणत्या तारखेला कोणाचा परफॉर्मन्स title=

Celebrities in Mahakumbh: उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाकुंभ मेळा 12 वर्षांनंतर आयोजित केला जातो. जेव्हा या मेळ्याचा योग 6 वर्षांनी येतो, तेव्हा त्याला अर्धकुंभ म्हटले जाते. भारतासहित देशविदेशातील लोक कुंभमेळ्यात भाग घेण्यासाठी येत असतात. त्यासोबतचं अनेक सेलिब्रिटीसुद्धा या मेळ्याची शोभा वाढवण्यासाठी येतात. या सेलिब्रिटींमध्ये कित्येक अभिनेते आणि अभिनेत्रींसह अनेक मोठमोठ्या गायकांचाही समावेश आहे.

शंकर महादेवन यांच्या परफॉर्मन्सने होणार महाकुंभची सुरुवात

संस्कृती मंत्रालयाच्या प्रेस रिलिजनुसार शंकर महादेवन, कैलाश खेर आणि शान यांसारखे सुप्रसिद्ध गायक या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी सज्ज होणार आहेत. 13 जानेवारीला पहिल्या दिवशी शंकर महादेवन आपल्या गायनाच्या कलेने कार्यक्रमाची शानदार सुरुवात करणार आहेत. मेळ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 26 फेब्रुवारीला प्रसिद्ध गायक मोहित चौहान त्यांच्या सादरीकरणाने या सोहळ्याचा समारोप करतील.

कोणते कलाकार कधी परफॉर्म करणार?

महाकुंभ 2025 मध्ये वेगवेगळ्या दिवसांमध्ये हे कलाकार सादरीकरण करणार आहेत. लोकप्रिय गायक शान मुखर्जी 27 जानेवारीला प्रक्षकांचं मनोरंजन करणार. त्यानंतर सुप्रसिद्ध गायक हरिहरन 10 फेब्रुवारीला तर कैलाश खेर 23 फेब्रुवारीला परफॉर्म करणार आहेत. याशिवाय कविता कृष्णमूर्ती, कविता सेठ, ऋषभ रिखीराम शर्मा, शोवना नारायण, डॉ. एल. सुब्रमण्यम, बिक्रम घोष आणि मालिनी अवस्थी यांसारखे अनेक दिग्गज कलाकार महाकुंभमध्ये त्यांच्या अनोख्या कलेद्वारे भक्तांना तृप्त करतील. या कलाकारांच्या परफॉर्मन्समुळे महाकुंभ मेळ्यातील भक्तांसाठी मंत्रमुग्ध करणारे वातावरण निर्माण होईल. महाकुंभ 2025 हा एक अविस्मरणीय अनुभव बनण्यासाठी कलाकार सज्ज झाले आहेत.

हे ही वाचा:  जीवन यशस्वी आणि समृद्ध बनवतील स्वामी विवेकानंद यांचे विचार

या कार्यक्रमांचे ठिकाण कोणते?

महाकुंभ मेळ्यातील हे परफॉर्मन्स कुंभ मेळा मैदानातील गंगा पंडालात होणार आहेत. येथे सांस्कृतिक नृत्य, लोकसंगीत आणि नाट्यकलेचे कार्यक्रम सादर केले जातील. या इव्हेंट्समुळे भक्त आणि पर्यटकांना भारताच्या समृद्ध संस्कृतीचा अनुभव घेता येईल, तसेच त्यांना आध्यात्मिक ज्ञानही मिळेल. 2025 चा महाकुंभ मेळा 12 वर्षांनंतर आयोजित केला जात आहे आणि या भव्य कार्यक्रमाला 45 कोटींपेक्षा जास्त भाविक उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे. महाकुंभ दरम्यान भाविक संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी एकत्र येतील. एकूण एक भारतातील या भव्य उत्सवाची नोंद संपूर्ण विश्व घेणार असे दिसून येत आहे.