Prajakta Mali, Prasad khandekar and Prarthana Behere's Reunion: पार्टी म्हटलं की जंगी सेलिब्रेशन आलंच. रियुनियनच्या असाच एका सेलिब्रेशनसाठी मराठीतील नामवंत कलाकार एकत्र जमले आहेत. ‘आईच्या गावात बाराच्या भावात घरात नुसता गोंधळ हो’ म्हणत या कलाकारांनी सेलिब्रेशनचा पारा फुल ऑन वाढवला आहे. ‘बुम बुम बुम बोंबला जीव हा टांगला’ म्हणत हे कलाकार प्रत्येकाला थिरकायला लावणार आहेत. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटातील प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे पार्टी टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, ऐश्वर्या बडदे, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे या कलाकारांची फौज ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात हास्याचे फवारे उडवत रंगत आणणार आहेत. त्यांच्या पार्टीतली गंमत आणि धमाल हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर 28 फेब्रुवारीला चित्रपटगृहात येणारा 'चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट तुम्हाला पहावा लागेल.
नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित, आयडियाज द एंटरटेनमेंट कंपनी प्रस्तुत आणि स्वर्ण पट कथा आणि प्रजाकार प्रोडक्शन्स यांच्या सहयोगाने येणाऱ्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. चित्रपटाचे निर्माते सुनील नारकर असून सहनिर्माते सेजल दिपक पेंटर आणि प्रसाद महादेव खांडेकर आहेत. चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांचे आहे. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे.
प्रशांत मडपुवार यांनी लिहिलेल्या या हॅपनिंग साँगला रोहन-रोहन जोडीचे जबरदस्त संगीत लाभले आहे. तर रोहन प्रधान यांच्या आवाजानं हे गाणं अधिकच जल्लोषमय झाले आहे. राहुल ठोंबरे यांनी या गाण्यासाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे. हे एनर्जेटिक गाणे तरूणाईला आवडणारं आहे. त्यामुळे तुम्हालाही ही उत्सुकता नक्कीच लागली असेल. तर याच चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून सगळीकडे याचीच चर्चा रंगली आहे.