Maharashtra Tourism : महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या वतीनं सातत्यानं काही नवे उपक्रम राबवण्यात येतात. बहुगुणसंपन्न महाराष्ट्राची प्रचिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्याच्या या खात्याकडून सोशल मीडियाचा आधारही घेतला जातो. पण, यावेळी मात्र याच सोशल मीडियावरील एका पोस्टमुळं महाराष्ट्रातील पर्यटन खातं वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. स्त्रीत्वाचा जागर करत राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये योगदान देत भक्कम पाया रचणाऱ्या महिलांचा उल्लेख करताना यामध्ये सावित्रीबाई फुले यांचा विसर पडल्याचं पाहायला मिळालं.
सावित्रीबाई फुलेंचा पर्यटन खात्याला विसर!
मुलींच्या शिक्षणासाठी समाजाचं वैर पत्करुन मोठ्या जिद्दीनं मुलींची पहिली शाळा सुरु करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना ज्ञानज्योती म्हणूनही संबोधलं जातं. पण, महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाईंचा विसर मात्र पर्यटन खात्याला पडला आहे. कारण, सोशल मीडिया पोस्टमध्ये मुलींच्या शिक्षणाची सुरूवात करणाऱ्या व्यक्ती म्हणून म्हणून फक्त फातिमा शेख यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
या पोस्टमध्ये कुठेही सावित्रीबाईंचा उल्लेख आणि फोटोही पाहायला मिळत नाही. पर्यटन खात्याच्या फेसबूक पेजवर ही पोस्ट करण्यात आली असून, 'महाराष्ट्रात स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करूया..!' या शीर्षकाखाली ही पोस्ट करण्यात आली आहे. पण, त्यात सावित्रीबाईंचा फोटो आणि उल्लेख टाळल्यामुळे सोशल मीडियातून पर्यटन खात्यावर सडकून टीका
करण्यात येत आहे.
झी 24 तासनं या बातमीचं वृत्तांकन केल्यानंतर सोशल मीडियावरून होणारा विरोध पाहता आणि लगेचच नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट पाहता पर्यटन खात्याकडून ही पोस्ट तातडीनं हटवण्यात आली. ही पोस्ट डिलीट करण्यात आली तरीही त्या पोस्टचा फोटो मात्र व्हायरल होत चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.
पर्यटन खात्यानं डिलीट केलेल्या या पोस्टमध्ये
'महाराष्ट्रात स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करूया..!
महाराष्ट्राला योद्धा महाराणी ताराबाई ते मुलींच्या शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या फातिमा शेख यांच्यापर्यंत इतिहास घडवणाऱ्या कर्तृत्ववान महिला लाभल्या. भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी असोत किंवा परदेशात राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या भिकाईजी कामा असोत, त्यांचे कार्य नव्या पिढ्यांना प्रेरणा देते. अशा महान स्त्रियांचा वारसा जाणून घेण्यासाठी एकदातरी महाराष्ट्र फिरायलाचं हवा....!
अतुलनीय कार्य करणाऱ्या दिग्गज व्यक्तींचे राज्यात योगदान आहे, म्हणून महाराष्ट्र मस्त आहे...!
या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी www.maharashtratourism.gov.in ला भेट द्या किंवा www.mahabooking.com संकेतस्थळावर तुमच्या सुट्टीचे नियोजन करा.', असा परिच्छेद लिहिण्यात आला होता.