न्यूझीलंड संघाचा क्रिकेटर रचीन रवींद्र (Rachin Ravindra) पाकिस्तानविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात गंभीर जखमी झाला आहे. रचीन रवींद्र झेल घेण्यासाठी धावला असता चेंडू नीट न दिसल्याने चेहऱ्यावर आदळला आणि त्यात जो जखमी झाला. चेंडूचा प्रहार इतका जोरात होता की रक्त वाहू लागलं होतं. अखेर त्याच्यावर रक्तबंबाळ अवस्थेत मैदान सोडण्याची वेळ आली. यानंतर अनेकांनी या दुखापतीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला जबाबदार धरलं. लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअममध्ये लावण्यात आलेल्या लाईट्समुळे ही दुर्घटना घडली असा दावा करण्यात आला. सामन्याच्या एक दिवस आधीच या मैदानाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. काहींनी तर पाकिस्तानमध्ये सामान्य सुविधाही नसल्याने चॅम्पिअन्स ट्रॉफी तिथे खेळवली जाऊ नये अशी मागणी केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर टीका होऊ लागल्यानंतर आता तेथील अनेजण यावर व्यक्त होऊ लागले आहेत. माजी कर्णधार सलमान बटने रचीनच या दुखापतीसाठी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. न्यूझीलंड क्रिकेटने अधिकृतपणे सांगितलं आहे की, या अष्टपैलू खेळाडूच्या कपाळावर जखम झाली आहे, ज्यासाठी टाके घालावे लागले आहेत आणि त्याच्यावर लक्ष ठेवले जाईल. दुसरीकडे सलमान बटने रचिन चेंडू समजण्यात अयशस्वी झाला आणि त्याची किंमत त्याला चुकवावी लागली असा दावा केला आहे.
"जेव्हा लोकांना समजून घेण्याची इच्छा नसते, तेव्हा समजावण्यात काही अर्थ नसतो. हे संबंधित नाही. मैदानात नव्या एलईडी लाईट लावण्यात आल्या आहेत, त्या उत्तम आहेत. जेव्हा न्यूझीलंडचे फलंदाज ताशी 150 किमी गोलंदाजीवर षटकार ठोकत होते तेव्हा लाईट बरोबर होती का? खेळाडू झेल घेण्यासाठी 70 मीटरवर उभा असताना अंदाज चुकला. तो चांगला क्षेत्ररक्षक आहे, पण कदाचित त्याचा पाय घसरल आणि जखमी झाला," असं सलमान बटने स्थानिक वाहिनीला सांगितलं.
सलमान बट याच्या भावनांना आणखी एक पाकिस्तानी न्यूज अँकरने दुजोरा दिला. या संपूर्ण वादाच्या दुसऱ्या दिवशी, कटकच्या बाराबती स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना एका फ्लडलाइटमध्ये बिघाड झाल्यामुळे जवळजवळ 30 मिनिटं थांबला. पीसीबीप्रमाणेच, बीसीसीआयलाही जनतेच्या टीकेचा सामना करावा लागला आणि हा मुद्दा इतका वाढला की ओडिशा क्रिकेट असोसिएशनला ओडिशा स्टेट कौन्सिलकडून एनओसी मिळाली आणि स्पष्टीकरण मागितले. अँकरने आपल्या भूमिकेत अडिग राहून म्हटलं की "अशा गोष्टी घडतात', परंतु पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचे अधिकार काढून घेण्याचा जो आवाज येत होता तो निरर्थक आहे".
"डियम तयार नसल्याने पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करू शकत नाही असं म्हणणाऱ्या त्याच लोकांना विचारू इच्छितो, 'बाराबती स्टेडियममध्ये जे घडले त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? ते एक स्थापित स्टेडियम आहे.' "म्हणून, मी असे म्हणू इच्छितो की या गोष्टी घडतात. हे मोठे मुद्दे नाहीत. फक्त रचिनच्या तोंडावर मार लागला म्हणून याचा अर्थ असा नाही की त्यासाठी पीसीबीला दोषी ठरवावे," असे तो म्हणाला.
याउलट, पाकिस्तानचा आणखी एक माजी क्रिकेटपटू तन्वीर अहमद याने पीसीबीवर टीका केली आणि म्हटले की ते स्टेडियमची देखभाल करण्यास असमर्थ आहेत. "आमच्याकडे पैसेही नाहीत. स्टेडियमची देखभाल करण्यासाठी जे काही केले जाते ते राज्य संघटनांकडून येते," असं तो म्हणाला आहे
दरम्यान, शोएब मोहम्मद यांचा मुलगा हनीफ मोहम्मद याला लाईट्समध्ये काहीतरी गडबड आहे असं वाटत आहे. "अगदी निश्चितच. खरं तर, रचीन रवींद्र जखमी होण्यापूर्वी डॅरिल मिशेललाही क्षेत्ररक्षण करताना चेंडू पाहण्यात काही अडचण येत होती असं मला जाणवलं. ज्या क्षणी त्याने सामान्य उंचीवर कॅच घेतला, तेव्हा मला लक्षात आले की त्याचे हावभाव सूचित करतात की तो चेंडू नीट पाहू शकत नाही," तो म्हणाला.
"तर जर त्यालाही अशीच समस्या आली असेल तर काहीतरी चूक आहे. फ्लडलाइट्सची जागा ही एक तांत्रिक बाब आहे. रचिन डीप स्क्वेअर लेगवर उभा होता आणि लाईट त्याच्या अगदी समोर होती. आता, स्टेडियममध्ये फ्लडलाइट्स सहसा तिथे लावले जात नाहीत. काही चमक आहे ज्यामुळे चेंडू खेळाडूंच्या दृष्टीतून हरवत आहे," अशी शंका त्याने व्यक्त केली.