84600 कोटी रुपयांवरुन राडा... मस्कची ओपन AI च्या मालकाला ऑफर; रिप्लाय पाहून संतापला

Elon Musk Vs Sam Altman Over OpenAI Bid: ओपनएआय ही कंपनी मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत असून यावरुनच दोन दिग्गज आमने-सामने आलेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 11, 2025, 12:42 PM IST
84600 कोटी रुपयांवरुन राडा... मस्कची ओपन AI च्या मालकाला ऑफर; रिप्लाय पाहून संतापला title=
दोघे आमने-सामने

Elon Musk Vs Sam Altman Over OpenAI Bid: 'टेस्ला'चे मालक एलॉन मस्क यांनी आर्टिफिशीअल इंटेलिजन्स कंपनी 'ओपनएआय'ला विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मस्क यांनी ही कंपनी 9.74 बिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास 84 हजार 600 कोटी रुपयांना विकत घेणार होता. मस्क यांच्या मालकीची एआय कंपनी 'एक्सएआय'बरोबरच वेलोर इक्विटी पार्टनर्स, बॅरन कॅपिटल्ससारख्या गुंतवणुकदारांनाही ही कंपनी विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

मस्क यांची ऑफर फेटाळली

मात्र मस्क यांची ही ऑफर 'ओपनएआय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांनी धुडकावून लावली होती. त्यांनी आपल्या 'एक्स' पोस्टमध्ये, "नको राहू देत, जर तुम्हाला (मस्क यांना) वाटत असेल तर आम्ही ट्विटर (आताचं 'एक्स') 9.74 बिलियन डॉलर्स (84000 कोटींनी) विकत घेऊन इच्छितो," असं म्हटलं होतं.

यावर रिप्लाय करताना मस्क यांनी, "स्कॅम अल्टमन" असा रिप्लाय दिला.

मस्क यांचा 'ओपनएआय'बद्दल आक्षेप काय?

मस्क यांनी 'ओपनएआय'ने आता ओपन-सोर्स, सेफ्टी फोकस्ड फोर्सवर परतण्याची वेळ आली आहे असं म्हटलंय. या गोष्टी झाल्या पाहिजेत याची आम्ही काळजी घेऊ. ही कंपनी विकत घेऊन त्यामधून बिगर नफा रिसर्च लॅब सुरु करण्याचा मस्क यांचा मानस होता. 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने दिलेल्या वृत्तानुसार, ही ऑफर मस्क यांचे वकील मार्क टोबेरॉफी यांच्या माध्यमातून सोमवारी 'ओपनएआय'च्या बोर्डाला देण्यात आलेली.

दोघांनी एकत्रच सुरु केलेली ही कंपनी पण मस्क यांनी...

2015 मध्ये मस्क आणि सॅम अल्टमन यांनी एकत्र 'ओपनएआय' कंपनीची स्थापना केली. मात्र 2018 मध्ये मस्क कंपनीपासून वेगळे झाले. मस्क यांनी 2023 'ओपनएआय'ची स्पर्धक कंपनी 'एक्सएआय' सुरु केली. ऑगस्ट 2024 मध्ये मस्क यांनी 'ओपनएआय'च्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत खटला दाखल केला. मस्क यांनी 'ओपनएआय'ने आपल्या बिगरनफा धोरणांना तिलांजलि दिल्याचा आरोप केला. ही कंपनी आता केवळ आर्थिक नफ्यासाठी काम करते असं मस्क यांचं म्हणणं आहे.

एआयची सुरक्षा महत्त्वाची असल्याचा मस्कचा दावा

एआय मानवासाठी फायद्याचं असलं तरी त्याची सुरक्षा महत्त्वाची असल्याचा युक्तिवाद मस्क यांनी केला आहे. या खरेदीच्यानिमित्ताने मस्क आणि अल्टमन हे टेक्नोलॉजी क्षेत्रातील दोन दिग्गज आणि पूर्वीचे सहकारी एकमेकांच्या आमने-सामने आल्याचं दिसत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मस्क आणि अल्टमन आता आमने-सामने पाहायला मिळत आहेत. त्यातच आता या वादाचीही भर पडलीये.