सूरत : एका शॉपिंग मॉलमध्ये रेखाटण्यात आलेली अभिनेत्री दीपिका पादूकोणच्या रुपातील 'पद्मावती'ची रांगोळी काही जणांनी विस्कटून टाकली. या प्रकरणात पोलिसांनी १३ जणांना अटक केलीय.
ही घटना सूरतमधल्या राहुल राज मॉलमध्ये घडलीय. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती'ला विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचं समोर येतंय.
करन जरीवाल नावाच्या एका कलाकारानं दीपिकाच्या रुपातील 'पद्मावती'ची रांगोळी अनेक तास खर्ची घालून रेखाटली होती. तब्बल ४८ तास करन या रांगोळीसाठी झटत होता. पण, हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या रांगोळीवर अक्षरश: थयथयाट केला. यामुळे, करनसाठी हा एक धक्काच होता.
अभिनेत्री दीपिका पादूकोणला ही बातमी समजल्यानंतर तिचाही रागाचा पारा चढला. 'हे आता थांबायला हवं... आणि कारवाई हवी' असं म्हणत दीपिकानं स्मृती इराणी यांना सोशल मीडियावर टॅग केलं.
this has to stop NOW & action must be taken! @smritiirani pic.twitter.com/o5RGhDTHPJ
— Deepika Padukone (@deepikapadukone) October 18, 2017
या घटनेमुळे मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या लोकांमध्येही दहशत दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १३ जणांना अटक केली.
हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र चौधरी यांनी याआधीही, हा सिनेमा प्रदर्शित झाला तर सिनेगृहात तोडफोड - जाळपोळ करण्यात येईल, अशी धमकी दिली होती. पद्मावती सिनेमात महाराणी पद्मावतीची भूमिका चुकीच्या पद्धतीनं सादर करण्याची 'शंका' या हिंदुत्ववादी संघटनेला असल्यानं ते या सिनेमाला विरोध करत आहेत.