मुंबई : झी मराठीवरील कुंकू या मालिकेतून घराघरात पोहोचलेला बालकलाकार प्रफुल्ल भालेरावचा रेल्वे अपघातात मृत्यू झालाय. मालाड येथे रेल्वे अपघातात त्याचे निधन झालेय.
कुंकू या मालिकेतील गणेश या भूमिकेतून प्रफुल्लला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. यात त्याने जानकीचा म्हणजेच मृण्मयी देशपांडेच्या भावाची भूमिका साकारली होती.
ही बातमी समजताच एक उमदा आणि गुणी कलाकार गमावल्याची भावना अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने व्यक्त केली. मृण्मयी आणि प्रफुल्ल यांनी तीन ते चार वर्षे मालिकेत एकत्र काम केले होते. तिचा मालिकेतील पहिला सीन हा प्रफुल्लसोबतच होता.
प्रफुल्ल अंत्यत अॅक्टिव्ह तसेच उमदा कलाकार होता. सुरुवातीला तो सीन करण्यासाठी रिटेक घेत असे मात्र त्यानंतर अनेकदा एका टेकमध्ये तो सीन शूट करत असल्याची आठवणही मृण्मयीने यावेळी सांगितली.