मुंबई : Navratri 2019 नुकतीच मोठ्या उत्साहात यंदाच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. आदिशक्तीचा जागर केल्या जाणाऱ्या या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रुपांची मनोभावे पूजा केली जाते. व्रतवैकल्यं करत देवीची आराधना केली जाते. सर्वत्र उत्साही वातावरणाची हीच लाट कलाविश्वातही पाहायला मिळत आहे.
नवरात्रौत्सव म्हटलं की नऊ रंग, देवीची रुपं, आदिशक्तीचा महिमा या साऱ्या गोष्टी ओघाओघाने आल्याच. पण, मुळात नवरात्रोत्सव म्हणजे एक असं पर्व जेव्हा प्रत्येक प्रसंगाचा धीराने सामना करणाऱ्या त्या 'स्त्री'च्या कर्तृत्वासाठी आणि तिच्या प्रत्येक निर्णयासाठी या दिवसांमध्ये जणू तिचे आभार मानले जातात.
याचंच सुरेख उदाहरण पाहायला मिळत आहे, ते म्हणजे एका अभिनेत्रीने नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमध्ये. ज्यामध्ये ही अभिनेत्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या रुपात दिसत आहे. रोखलेली नजर, अर्धवट पाण्यात बुडालेली देवी, आणि तिचं करवीर.... असं रुप दाखवलं आहे अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने. अतिशय वास्तवदर्शी असा हा फोटो सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे.
'याच उघड्या डोळ्यांनी विनाशाचं तांडव पाहत होते मी. माझ्यासमोर जोडले जाणारे अनेक हात वाहत जाताना पाहत होते मी...', असं म्हणत अंबाबाईच्या हतबलतेची कथा तिने या फोटोच्या कॅप्शनमधून मांडली आहे. 'मी अवतरणार तरी कशी ?' असा प्रश्न उपस्थित करत, शहरीकरण आणि स्वार्थासाठी मानवाने कसे एका दैवी शक्तीचेच हात छाटले त्यावर कटाक्ष टाकला आहे.
'मत्स्येंद्री ने फ़ुलणारा माझा रंकाळा जलपर्णीनी जखडून टाकलास तू', असं म्हणतच म्हणूनच पुराच्या पाण्यात सारं करवीर उध्वस्त होत असतानाही 'सावरू शकले नाही तुला...', हे वास्तव एका दैवी रुपातून तेजस्विनीने सर्वांसमोर आणलं आहे. देवीच्या मनात या साऱ्याविषयी क्रोधाग्नी असला तरीही शेवटी तीसुद्धा एक आई आहे, कठोर झाले तरी साथ नाही सोडणार... बहरायचं नाही सोडणार.... असं लिहित नवरात्रीची एक सुरेख आणि वास्तवदर्शी बाजू तेजस्विनीने सर्वांसमोर आणली आहे.