मुंबई : रविंद्र नाट्यमंदिर येथे नाटकाचा प्रयोग सुरु असतानाच प्रेक्षकांमधून एकाचा फोन खणाणल्यानंतर अभिनेते सुबोध भावे यांच्या रागाचा पारा चढला. प्रयोगादरम्यान झालेल्या या सर्व प्रकारानंतर भावे यांनी थेट सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित संताप व्यक्त केला. आपण नाटक करणं बंद करुया का?, असाच थेट प्रश्न त्यांनी या प्रेक्षकाला केला.
नाट्यगृहात झालेल्या घडलेल्या या प्रसंगाविषयी भावे यांनी झी २४तासशी संवाद साधताना माहिती दिली. 'ही उदविग्नता नाही. पण, मुंबईतील पावसाची सद्यस्थिती पाहता अनेक रसिकांनी प्रवास करत, काही अडचणींचा सामना करत नाटकाच्या प्रयोगाला हजेरी लावली होती. पण, त्यातच हा फोन वाजला', असं ते म्हणाले. फोन वाजणं हा कलाकारांचा नव्हे, तर एक प्रकारे प्रेक्षकांचाही अनादर आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या जीवनातील काही तास खर्ची घालून प्रेक्षक निखळ मनोरंजनासाठी येतात. अशा प्रसंगी त्यांचं मनोरंजन करण्याची सर्वतोपरी जबाबदारी ही कलाकारांची असते, ही वस्तूस्थिती त्यांनी सर्वांसमोर ठेवली.
आपलं मत मांडण्यासाठी आणि झाल्या प्रकाराविषयी काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी म्हणून भावे यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही लिहिली. 'अनेक वेळा सांगून, विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज वाटत नाही. यावर उपाय एकच या पुढे नाटकात काम न करणं.
म्हणजे त्यांच्या फोन च्या मध्ये आमची लुडबुड नको. कारण फोन जास्त महत्त्वाचा.नाटक काय टीव्ही वर पण बघता येईल', असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं. भावे यांनी ही पोस्ट लिहिल्यानंतर कमेंटबॉक्समध्ये अनेकांनीच यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
नाटक सुरु होण्यापूर्वी कायमच फोन (मोबाईल) सायलेंट मोडवर ठेवण्याची विनंती प्रेक्षकांना करण्यात येते. पण, अनेकदा या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात येतं. परिणामी नाटकाच्या प्रयोगात एकरुप झालेल्या कलाकारांची एकाग्रता अनेकदा भंग होते, ज्यामुळे रंगाचा बेरंगही होतो. यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, अनेक कलाकारांनी याविरोधात आवाज उठवला आहे. कलाकारांची हीच भूमिका पाहत आता प्रेक्षकांनीच जबाबदारपणे वागण्याची गरज वाटू लागली आहे.