मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’चा ९ वा सीझन घेऊन बीग बी लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. खेळ जुनाच असला तरीही त्यामॅधील इंटरेस्ट वाढवण्यासाठी काही नवे बदल करण्यात येणार आहेत.
खेळाचे नियम, विविध टप्पे आणि लाईफलाइनमध्ये प्रामुख्याने बदल झाल्याने यंदाच्या ‘कौन बनेगा करोडपती’ची रंगत अजुनच वाढणार आहे.
व्हिडिओ-ए-फ्रेंड
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आता फोन ऐवजी व्हिडिओ कॉलचा ऑप्शन देण्यात येणार आहे. 'व्हिडिओ-ए-फ्रेंड’हा नवीन बदल आहे. यापूर्वीच्या सिझनमध्ये स्पर्धक ‘फोन-ए-फ्रेंड’हा पर्याय वापरून मित्रांना किंवा नातेवाईकांना फोन करुन उत्तर विचारायचे. आता फोनऐवजी थेट व्हिडिओ कॉल करुन स्पर्धक संवाद करणार आहेत. या सुविधेमुळे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्याशीही व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्याची संधी काहींना मिळणार आहे.
लाईफलाइन जोडीदार
यंदाच्या नव्या सिझनमध्ये एक नवीन लाईफलाइन मिळणार आहे. ‘लाईफलाइन जोडीदार’च्या पर्यायामुळे स्पर्धकासोबत हॉट सीटवर बसण्यासाठी एक पार्टनर आणावा लागणार आहे.
जॅकपॉट प्रश्न
जॅकपॉट प्रश्न हा महत्त्वपूर्ण बदल आहे. हा जॅकपॉट प्रश्न निवडल्यास इतर सर्व लाईफलाइन बाद होतील. मात्र प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्यास स्पर्धकाला थेट सात कोटी रक्कम जिंकता येणार आहे. यापूर्वी जिंकलेली रक्कम धनादेश स्वरुपात दिली जायची. आता डिजीटल पेमेंटद्वारे म्हणजेच स्पर्धकाच्या बँक खात्यात थेट ही रक्कम जमा होणार आहे.
वेग वाढणार
एका तासात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढवून केबीसीचा हा नववा सिझन अजूनच गतीमान केला आहे. त्याचप्रमाणे उत्तरासाठी स्पर्धकांना दिला जाणारा वेळ कमी करण्यात येणार आहे. केवळ सहा आठवड्यांसाठी हा शो असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. केबीसीचे ३० एपिसोड या सिझनमध्ये प्रसारित होणार आहे.
खास एपिसोड
विशेष एपिसोडमध्ये आपल्याला हॉट सीटवर रिअल लाइफ हिरो पाहायला मिळणार आहेत. ३० एपिसोड्सपैकी काही भाग हे विशेष एपिसोड असतील. ज्यामध्ये बिग बी रिअल लाइफ हिरोंना शोमध्ये आणणार आहेत.
यंदाच्या सिझनसाठी सात दिवसांमध्येच १ कोटी ९८ लाख प्रेक्षकांनी रजिस्ट्रेशन केले होते. येत्या २८ ऑगस्टपासून सोनी वाहिनीवर रात्री नऊ वाजता हा शो प्रसारित होईल.