Dwarkanath Sanzgiri Death: द्वारकानाथ संझगिरी काळाच्या पडद्याआड! 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dwarkanath Sanzgiri Death: द्वारकानाथ संझगिरी यांच्यावर मुंबईतील रुग्णालयामध्ये मागील काही काळापासून उपचार सुरु होते. मात्र आज त्यांची मृत्यूविरुद्धची झुंज अपयशी ठरली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 6, 2025, 01:01 PM IST
Dwarkanath Sanzgiri Death: द्वारकानाथ संझगिरी काळाच्या पडद्याआड! 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास title=
मुंबईमध्ये झालं निधन

Dwarkanath Sanzgiri Death: प्रसिद्ध लेखक तसेच ज्येष्ठ क्रिकेट समिक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील लिलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रदिर्घ आजारानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली. स्तंभलेखक, लेखक, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता आणि संगीत कार्यक्रमाचे सादरकर्ते म्हणून संझगिरी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. जवळपास 50 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये संझगिरी यांनी अनेक मासिके आणि वर्तमानपत्रांसाठी लेखन केलं. संझगिरींनी प्रामुख्याने मराठीत, पण इतर काही प्रादेशिक भाषांबरोबरच इंग्रजीमध्येही त्यांनी स्तंभलेखन केलं.

40 पुस्तके लिहिली

द्वारकानाथ संझगिरी यांचा जन्म मुंबईत दादर (पूर्व) येथील हिंदू कॉलनीत 15 नोव्हेंबर 1950 रोजी झाला. द्वारकानाथ संझगिरी यांनी किंग जॉर्ज स्कूल (आताचे राजा शिवाजी विद्यालय) आणि रामनारायण रुईया महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यांनी व्हीजेटीआय (वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, पूर्वीची व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट), माटुंगा येथून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर 40 पुस्तके लिहिली आहेत.

एकाच वेळी दोन क्षेत्रात काम

द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांत कारकीर्द केली, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून ते 2008 मध्ये मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. त्याचबरोबर त्यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

अनेक वृत्तपत्रांमध्ये लेखन

संझगिरी यांनी 1970 च्या उत्तरार्धात लेखन कारकीर्द सुरू केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ यासारख्या मासिकांमध्ये नियमितपणे लेखन केले. 1983 साली भारताने इंग्लंडमध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर संझगिरी यांनी इतर काही मित्रांसह 'एकच षटकार' हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले. या पाक्षिक क्रीडा मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून संझगिरी यांनी काम केले. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून संझगिरींनी ‘आज दिनांक’, ‘सांझ लोकसत्ता’, ‘मिड-डे’, ‘तरुण भारत’, ‘पुढारी’ आणि इतर अनेक प्रकाशनांसाठी स्तंभलेखन करायला सुरुवात केली. 'लोकसत्ता'मधील त्यांचे क्रीडा लेख आणि प्रवासवर्णनसंबंधीत स्तंभ खूप गाजले. संझगिरी हे 25 वर्षांहून अधिक काळ ‘सामना’साठी अनेक क्रिकेट मालिकांचं वृत्तांकन करत होते. 

स्टँडअप टॉक शो ते पटकथा लेखक

द्वारकानाथ संझगिरी यांनी 1983 पासून ते आजपर्यंतचे सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धांचं वृत्तांकन केलं. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धापासून संझगिरी एकपात्री स्टँडअप टॉक शोही करायचे. त्यांनी हजाराहून अधिक असे कार्यक्रम केले. 'बोलंदाजी' या स्पोर्ट्स दूरचित्रवाणी कार्यक्रमसाठी ते प्रस्तुतकर्ता होते आणि 'मधु इथे अन् चंद्र तिथे' या अजून एका दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे पटकथा लेखक होते. क्रिकेट विश्लेषक आणि तज्ज्ञ म्हणूनही ते विविध टीव्ही चॅनेल्सवर नियमितपणे दिसायचे.