मुंबई : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने 'राझी', 'सत्यमेव जयते' यांसारख्या हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारत बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता पुन्हा एकदा अमृता हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृता 'मलंग' चित्रपटात भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी अमृताने चांगलीच मेहनत घेतली आहे. यासाठी अमृताने तब्बल १२ किलो वजन कमी आहे.
'मलंग' चित्रपटांत अमृता कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण अमृताने मात्र चित्रपटातील भूमिकेसाठी अतिशय मेहनत घेतली असल्याचं दिसतंय. 'मलंग' चित्रपटात अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, दिशा पटाणी, कुणाल खेमू जबरदस्त भूमिकेत दिसत आहेत. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ऍक्शन, लव, थ्रिलर असणाऱ्या 'मलंग'च्या दमदार ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसतेय
मोहित सुरी दिग्दर्शित 'मलंग' व्हॅलेंटाईन विक म्हणजेच ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
अमृताने नेहमीच विविध विषयांवरील, विविध धाटणीच्या अनेक भूमिकांना न्याय दिला आहे. 'राझी'मधील अमृताची छोटीशी भूमिकाही अनेकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे आता 'मलंग'मधून अमृता काय कमाल करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.