Saif ali Khan: बॉलिवूडच्या सुपरस्टार सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरून गेली आहे. सैफच्या घराच्या आत एवढी भयंकर घटना कशी घडली, यावर अजूनही सेलिब्रिटींचा विश्वास बसत नाही. या घटनेनंतर प्रसिद्ध दिग्दर्शक आकाशदीप साबिर (Aakashdeep sabir) यांनी सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर करीना कपूरवर टीका केली. टीव्हीवरील एका चर्चा कार्यक्रामत भाग घेतला असताना आकाशदीप यांनी सैफ हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिय दिली.
दिग्दर्शक आकाशदिप यांनी चित्रपटात नायक आणि नायिकेच्या मानधनातील असमानतेवर टीक केली आहे. आकाशदीप साबिर म्हणाले “करीनाला नायकांपेक्षा कमी मानधन मिळतं, म्हणून ती पूर्ण वेळ वॉचमन ठेवू शकत नाही.” Lehren Retro या कार्यक्रमातील एका मुलाखतीत आकाशदीप म्हणाले, “करीना 21 कोटी रुपये मानधन घेते आणि तरीही तिच्या घराबाहेर एक चौकीदार ठेवू शकली नाही. जर तुम्ही तिला 100 कोटी रुपये मानधन दिलं, तर कदाचित ती सुरक्षा रक्षक आणि पूर्ण वेळ ड्रायव्हर ठेवू शकेल.” त्यांनी करीना कपूरवर तिरकस टिप्पणी केली. पण ही टिप्पणी त्यांनी मस्करी म्हणून केली. खरं तर सैफ आणि करीनाला पाठिंबा देत ते म्हणाले की "त्यांना सावरण्यासाठी वेळ दिला पाहिजे".
आकाशदीप साबिर यांनी स्पष्ट केलं की ते करिना कपूरला खूप वर्षांपासून ओळखतात. ते म्हणाले, “जेव्हा मी करीनाला पहिल्यांदा भेटलो, तेव्हा ती लहान मुलगी होती. ज्या वेळी करिश्माने ‘सहारा’ वाहिनीवर पदार्पण केलं होतं. त्या वेळी करीना अभिनेत्री झाली नव्हती, ती लहान होती.”
हे ही वाचा: भावाच्या लग्नासाठी मुंबईत पोहोचली देसी गर्ल प्रियांका; Instagram ला शेअर केले फोटो
बिल्डिंगच्या सुरक्षेबद्दल बोलताना आकाशदीप साबिर म्हणाले, “मी सैफ आणि करीनाचा समर्थन करण्यासाठी टीव्हीवरील चर्चेत भाग घेतला होता. सैफ आणि करीना हे खूप चांगले कपल आहेत, पण, चर्चेत मला दोन प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत. लोक विचारत होते की त्यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षक का नव्हता? त्यांच्या बिल्डिंगमध्ये 30 सीसीटीव्ही कॅमेरे असतील, पण कॅमेरे चोराला थांबवू शकत नाहीत, ते फक्त गुन्हा उघडकीस आणण्यास मदत करू शकतात. दुसरा प्रश्न असा होता की त्यांच्याकडे रात्रीसाठी ड्रायव्हर का नव्हता?”
ही संपूर्ण घटना आणि यावर होणाऱ्या प्रतिक्रिया यामुळे बॉलिवूडमध्ये चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर या दोघांनीही अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, त्यांच्या चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.