मुंबई : चित्रपटसृष्टीत कलाकार हे फक्त त्यांच्या चित्रपटांमुळेच नव्हे तर, त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही प्रकाशझोतात असतात. अनेकदा या सेलिब्रिटींमध्ये असणारी नाती ही चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. बॉलिवूड वर्तुळातकील मैत्रिचं असंच एक उदाहरण म्हणजे अभिनेत्री तब्बू आणि सलमान खान, अजय देवगण यांच्यातील मैत्री. एक काळ गाजवणारे हे कलाकार कायमच प्रेक्षकांच्या पसंतीचे. त्यातही त्यांची मैत्री म्हणजे चर्चेचाच विषय.
सर्वसाधारण सहकलाकारांपासून अजय आणि सलमान हे आपल्याला कुटुंबाप्रमाणेच महत्त्वाचे आहेत, ही बाब तब्बूने सांगितली. 'माझ्या आयुष्यातील ही काही नि:स्वार्थ नाती आहेत. माझ्या कामानेच व्यापलेल्या आयुष्यात या दोन व्यक्तींचं स्थान आणि त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे', असं ती म्हणाली. कामाच्याच निमित्ताने भेट घडलेल्या या दोन व्यक्ती, सलमान आणि अजय हे कधीही कोणत्याही प्रसंगात आपल्याला अडचणीत येऊच देणार नाहीत असा विश्वास तिने व्यक्त केला. ते माझ्या कुटुंबाप्रमाणेच आहेत, असं म्हणत मैत्रीच्या नात्याची वेगळी बाजू तिने सर्वांसमोर ठेवली. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तिने हे वक्तव्य केलं.
१९९४ मध्ये हिंदी कलाविश्वात अजय देवगणसोबत स्क्रीन शेअर करत विजयपथ या चित्रपटातून तब्बू प्रसिद्धीझोतात आली होती. पुढे तिने त्याच्यासोबत 'हकिकत', 'Thakshak', 'दृश्यम', 'फितूर', 'गोलमाल अगेन' आणि 'दे दे प्यार दे' अशा चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली. तर, सलमान सोबत तिने 'बिवी नंबर १', 'हम साथ साथ है' आणि 'जय हो' या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटातही ती झळकणार आहे. कारकिर्दीत हे तिन्ही कलाकार कितीही पुढे गेले तरीही त्यांच्यात असणारं हे नि:स्वार्थ नातं मात्र कायम आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.