Aishwarya Rai Bachchan: मिस वर्ल्डचा पुरस्कार जिंकणारी ऐश्वर्या राय फक्त सौंदर्यासाठीच नाही तर तिच्या अद्वितीय अभिनयासाठी सुद्धा ओळखली जाते. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय ही गेल्या कही दिवसांपासून खासगीजीवनामुळे चर्चेत होती. पण आता एका चित्रपटात घातलेल्या नक्षीदार लेहंग्यामुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. ऐश्वर्याने 27 वर्षांपूर्वी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तिने या 27 वर्षांत कित्येक चित्रपटांमध्ये काम केले असून त्यातील अनेक सुपरहिट ठरले आहेत. तसाच एक चित्रपट 'जोधा-अकबर' हा 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिने एकापेक्षा एक भरजरीत लेहंगे, आकर्षक दागिने घातले होते. ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांनी 'जोधा-अकबर' मध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. याची गाणी सुद्धा खूप गाजली होती. 16 वर्षांपूर्वी जोधा-अकबर या चित्रपटात घातलेल्या एका लेहंग्याची आता 16 वर्षांनंतर थेट 'ऑस्कर'मध्ये निवड झाली आहे. हा सुंदर लेहंगा ऐश्वर्याने चित्रपटात लग्नाच्या वेळी घातला होता. या लेहंग्याला सुप्रसिद्ध डिझायनर नीता लुल्लाने तयार केले आहे. हा नक्षीदार लेहंगा एक अद्वितीय मास्टरपीस आहे. तो लेहंगा आता जगभरातील लोकांना दाखवण्यात येणार आहे.
ऑस्कर म्यूझियमने या सुंदर भारतीय पोषाखाचा त्याच्या आगामी प्रदर्शनामध्ये समावेश केला आहे. लेहंग्याची विशेषता म्हणजे यावर केलेले बारीक विणीचे भरतकाम. यावरील नक्षीदार भरतकाम भारतीय परंपरिक कलेचा एक उत्तम नमुना आहे. हा लेहंगा विविध रत्नांनी जडीत असून ऐश्वर्याने या लेहंग्यावर घातलेल्या दागिन्यात सुद्धा सुंदर कुंदनांचा मोर बनवलेला आहे. या दिमाखदार लुक आणि राजेशाही कोस्ट्युममध्ये ऐश्वर्या खूप आकर्षक दिसत होती. 'अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस' ने यावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात या लेहंगा आणि दागिन्यांचा व्हिडिओ दाखवण्यात आला आहे.
ऑस्कर पुरस्कारांसाठी प्रसिद्ध अॅकेडमीने याची माहिती इनस्टग्रामवर दिली असून जोधा-अकबरच्या एका सीनचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 'जोधा अकबर'चे काही सीन्सही आहेत, ज्यात हृतिक रोशन अकबरच्या भूमिकेत दिसत आहे. 'जोधा अकबर' मधील ऐश्वर्या रायने घातलेला लाल रंगाचा लेहंगा अजूनही लोकांना आवडतो. अकादमीने पोस्टमध्ये त्याचे वर्णन 'राणीसाठी परफेक्ट' असे केले आहे. भारतीय पारंपारिक कलेला जागतिक स्तरावर नेण्याचं काम हा लेहंगा करणार आहे. हा फक्त एक आउटफिट नाही तर भारताच्या समृद्ध कलेचं मोठं उदाहरण आहे असं म्हणता येईल.