मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी विमानातून प्रवास केलाच असेल. येथे आपल्यासोबत सहप्रवासी आणि एअर होस्टेस असतात. एअर हॉस्टेस आपल्याला प्रवासादरम्यान मदत करतात. परंतु एका महिलेसोबत प्रवासादरम्यान जो प्रकार घडला तो खरोखरंच धक्कादायक आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की, हे विमान खासगी आहे. परंतु तसे नाही. या मागिल कारण हे वेगळंच आहे. या महिलेचं नाव अरोरा टोरेस आहे. तिला जेव्हा कळले की, नॉर्वेमध्ये रोरोसला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये ती एकमेव प्रवासी आहे. तेव्हा तिने आपला अनुभव सोशल मीडियावर पोस्ट केला. तिने रिकाम्या विमानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, जे पाहून सगळ्यांनाच असं आपल्यासोबत देखील व्हावं असं वाटत आहे.
खरंतर या महिलेनं ज्या विमानाचं तिकीट बुक केलं होतं. त्यामध्ये ती एकटीच प्रवासी होती. तिच्यासोबत दुसरं कोणीच नव्हतं. ती एकटी असूनही तिलो कोणत्याही दुसऱ्या फ्लाईटमध्ये न पाठवता, तिच्यासाठी ते विमान उडवण्यात आलं.
या प्रवासादरम्यान या महिलेनं मात्र फारच मज्जा केली. तिला राजेशाही थाट मिळाला. एकटीनं प्रवास करण्याची संधी आणि विमानाच्या मोठ्या खिडकीतून प्रवासाचा आनंद घेण्याची संधी मिळाली. या प्रवासात तिला एअर होस्टेसने देखील मदत केली आणि तिला हवं नको, त्या गोष्टी पुरवल्या.
या महिलेसोबत या प्रवासात जे काही घडलं, त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला
व्हिडीओमध्ये, ऑरोरा तिच्या आजूबाजूच्या रिकाम्या जागांवर कब्जा करताना दिसत आहे. तशीच ती दोन पायलटच्या मागे हेडसेट लावून बसलेली देखील दिसत आहे. ती पायलटच्या इतक्या जवळ येऊन बसली की, ते विमान कसं उडवतात हे देखील तिला पाहाता येत आहे. तसेचं तिला विमानाच्या समोरच्या मोठ्या खिडकीतून देखील या प्रवासाचा आनंद घेता आला असल्याचे दिसत आहे.
ही महिला आपल्या या प्रवासाबद्दल सांगताना म्हणाली, 'फ्लाइट अटेंडंट मला खूप छान वाटल्या आणि आम्ही थोडा एकमेकांशी बोललो देखील. हा प्रवास 50 मिनिटांचा होता. तेव्हा मी त्यांना विचारले की, मला लँडिंगच्या शेवटच्या 30 मिनिटांत कॉकपिटमध्ये बसायचे आहे आणि त्यांनी मला असं करण्याची संधी देखील दिली.'
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फक्त इंस्टाग्राम सारख्या एका प्लॅटफॉर्मवर तो 27 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा व्हिडीओ पाहून आपल्याला ही अशी संधी मिळावी असे नेटीझन्सनी म्हटलं आहे. एका यूजरने विचारले, 'माझ्यासोबत असे का होऊ शकत नाही?' दुसऱ्याने लिहिले, 'हे माझे स्वप्न आहे.' तर एकाने लिहिले 'माझ्या मनात पहिली गोष्ट आली की तिने सीट विकत घेतल्या होत्या.'