मुंबई : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाही. रशिया काही युद्ध थांबवायची तयारी दाखवत नाही, तर युक्रेन देखील धाडसाने मागे हटत नाही. दोन्ही देशांमधील या युद्धामुळे जीवित आणि मालमत्तेची हानी होत नाही, तर जगभरात आर्थिक मंदीचा काळही आला आहे. या मंदीचे खोल परिणाम भारताच्या दक्षिणेला वसलेला श्रीलंकेवर दिसत आहेत. श्रीलंकेची अर्थव्यवस्था सतत ढासळत चालली आहे. देशात इंधनासाठी सामान्य खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. लोक रांगेत उभे राहून पेट्रोल खरेदी करत आहेत. या लांबलचक रांगेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची बातमीही समोर आली आहे.
परंतु श्रीलंकेची अवस्था इतकी बिकट होण्याचे कारण काय? हा प्रश्न लोकांना पडला आहे. तर आज आम्ही तुम्हाला या मागील काही मुद्दे सांगणार आहोत.
श्रीलंकेतील चलनवाढीचा दर आशियाई देशांमध्ये सर्वाधिक 15% आहे. त्यामुळे देशात महागाई वाढतच चालली आहे. परकीय गुंतवणूक कमी झाल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे मानले जात आहे.
ही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याला सामोरे जाण्यासाठी येथील सरकारने देशातील व्याजदरात वाढ करण्याचे ठरवले आहे, तसेच ज्या वस्तूंची विशेष गरज नाही अशा वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे.
सध्याच्या परिस्थितीत, देशाकडे केवळ USD 2 अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा आहे, तर या वर्षी देशाचे दायित्व USD 7 अब्ज आहे. अशा परिस्थितीने श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे.
यावर मात करण्यासाठी, देशाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) आशा ठेवल्या आहेत, ज्यामुळे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी IMF ला श्रीलंकेला मदत करण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांत देशात पेट्रोलियम गॅसच्या किमती पन्नास टक्क्यांनी वाढल्या आहेत. श्रीलंका गेल्या तीस वर्षांपासून तीव्र गृहयुद्धाचा सामना करत आहे. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे.
सुमारे अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात औषधांपासून इंधनापर्यंत दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी आयात केल्या जातात.
त्याच्या एकूण आयातीपैकी 20% इंधन आयातीचा वाटा आहे. गेल्या एका वर्षात त्याची किंमत 88% ने वाढली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा बोजा पडला आहे.
वर्ल्ड डेटा ऍटलसनुसार, श्रीलंकेच्या एकूण जीडीपीपैकी 12.9% वाटा हा पर्यटन व्यवसायातून येतो. येथे येणाऱ्या पर्यटकांपैकी तीस टक्के हे रशिया, युक्रेन, बेलारूस आणि पोलंडचे आहेत. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे इथून येणाऱ्या पर्यटकांची संख्या अचानक कमी झाली आहे. त्यात गेली दोन वर्ष कोरोनामुळे देखील पर्यटन व्यवसाय ठप्पं असल्यामुळे श्रीलंकेला मोठा फटका सहन करावा लागला आहे.