कोरोना व्हायरसबाबत ३० जानेवारीलाच दिला होता इशारा - जागतिक आरोग्य संघटना

...तेव्हा जगाने आमचं काळजीपूर्वक ऐकायला हवं होतं

Updated: Apr 28, 2020, 12:37 PM IST
कोरोना व्हायरसबाबत ३० जानेवारीलाच दिला होता इशारा - जागतिक आरोग्य संघटना title=
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस

नवी दिल्ली :  जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस  (Tedros Adhanom) यांनी, 30 जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसविषयी आंतरराष्ट्रीय चिंता व्यक्त करत, सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करत जागतिक आणीबाणीचा इशारा दिला होता, असं सांगितलं आहे. त्यावेळी चीनच्या बाहेर 100हून कमी कोरोना रुग्ण होते आणि कोणाचाही मृत्यू झाला नव्हता.

जगाने, जागतिक आरोग्य संघटनेचं त्यावेळी काळजीपूर्वक ऐकायला हवं होतं, असं टेड्रोस म्हणाले.

प्रत्येक देश आपल्या सर्व सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांची सुरुवात करु शकत होता. प्रत्येक देशाने WHOने दिलेल्या सल्ल्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे होते, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटलं आहे.

टेड्रोस यांनी सांगितलं की, WHOने सुरुवातीपासूनच विज्ञान आणि पुराव्यांच्या आधारावर योग्य इशारा देण्यात आला होता. परंतु आमच्याकडे असा कोणताही मॅनडेट नाही की, आम्ही देशांना आमचा सल्ला स्वीकारण्यास भाग पाडू शकू. 'आम्ही संपूर्ण जगाला एक व्यापक सार्वजनिक आरोग्य दृष्टीकोन लागू करण्याचा सल्ला दिला आणि आम्ही शोध, चाचण्या, आयसोलेशन आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठी सांगितलं होतं' असं ते म्हणाले.

WHO प्रमुखांनी सांगितलं की, आपण स्वतः पाहू शकतो की, ज्या देशांनी या गोष्टींचं अनुसरण केलं आहे ते इतर देशांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहेत आणि हे सत्य आहे. प्रत्येक देशाची स्वतःची जबाबदारी असते. प्रत्येक देश दिलेला सल्ला पाळतात की नाकारतात, हे प्रत्येक देशांच्या इच्छेवर अवलंबून आहे.

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसची स्थिती योग्यप्रकारे न हाताळल्याबद्दल आणि चीनची बाजू घेतल्याचा आरोप करत, अमेरिकेकडून WHOला देण्यात येणाऱ्या निधीवर बंदी घातली.
कोरोना व्हायरस ही जागतिक महामारी आतापर्यंत जगातील 192 देशांमध्ये पोहचली आहे. या व्हायरसने जगभरातील 2 लाखांहून अधिकांचा बळी घेतला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा सर्वाधिक 55 हजारांहून अधिक आहे.