Viral Video: जगात आईसारखी सुंदर गोष्ट नाही, आणि ज्याच्या नशिबी आईचं प्रेम आहे त्याच्यासारखा भाग्यवान कोणीही नाही. मुलांच्या प्रेमाखातर आई कोणत्याही स्तराला जाण्यास तयार होते. आईच असते जिच्याइतकं प्रेमळ जगात कोणी नाही, आणि मुलांना वाचवण्याची वेळ आली तर तिच्यासारखं कठोर कोणी नाही. आईच्या पंखाखाली प्रत्येक मुलाला सुरक्षित वाटत असतं. दरम्यान असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये आई मुलांच्या प्रेमापोटी आपला जीवही धोक्यात घालू शकते याचा प्रत्यय येत आहे.
आपलं प्रेम आणि धैर्य दाखवताना एक मादी बिबट्या थेट सिंहाशी भिडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. आपल्या दोन पिल्लांना वाचवण्यासाठी आई बिबट्या थेट सिंहाशी लढा देते. कॅरोल आणि बॉब या आफ्रिकन जोडप्याने टांझानियामधील सेरेनगेटी नॅशनल पार्कमधील ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे.
24 ऑक्टोबरला 'LatestSightings' या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. कॅरोल आणि बॉब हे रेंजरसह सकाळी सफारी राईडला निघाले होते. रेंजरला बिबट्या त्या परिसरात असल्याचं माहिती होतं. तसंच तिथे थांबल्यानंतर काहीतरी पाहायला मिळेल हे त्याच्या लक्षात आलं. त्यातच त्यांना बिबट्या आणि तिची दोन पिल्लं दिसली. पण तिच्या हालचाली पाहिल्यानंतर काहीतरी गडबड असल्याचं त्यांना जाणवलं.
बिबट्या मादी खडकाच्या टोकावर उभी होती. "बिबट्या गुहेच्या बाहेर होती जेव्हा माझ्या पतीला काही मीटर अंतरावर एक सिंहीण दिसली, ती त्याच दिशेने लक्षपूर्वक पाहत होती," असं कॅरोलने सांगितलं. “आम्हाला सुरुवातीला वाटले की दोन वेगळ्या घटनांचे आपण साक्षीदार ठरत आहोत. एकीकडे बिबट्या आणि तिची पिल्ले आणि दुसरीकडे सिंहीण दिसत होती. पण जसजशी ती पुढे सरकली, आम्हाला कळले की तिचे लक्ष बिबट्यांवर होतं!”, असं ती पुढे म्हणाली.
सिंहीण जवळ येताच बिबट्याने तिच्या अंगावर उडी मारली आणि दोघांमध्ये जोरदार झुंज सुरु झाली. बिबट्या मादीने आपल्या जीवाची चिंता न करता पिल्लांचा जीव वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. अखेर बिबट्या मादीचं रौद्ररुप पाहून सिंहीणीला पळ काढावा लागला.
यादरम्यान पिल्लं गुहेतच लपली होती. जेव्हा सिंहीण पळून गेली तेव्हा बिबट्या मादीनेही तेथून पळ काढला. अहवालानुसार, बिबट्याला दुपारी दोनदा तिच्या पिल्लांची जागा बदलावी लागली. “ती थकल्यासारखी वाटत होती पण तिला फक्त किरकोळ दुखापत झाली होती. सिंहीणीबद्दल सांगायचे तर, तिचा पाय खूप दुखत होता,” असं रिपोर्टमध्ये सांगितलं आहे.