Batenge to katenge: भाजपनं निवडणूक प्रचारात बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ हैचा नारा दिलाय. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना हा नारा रुचलेला नाही. पंकजा मुंडेंनी भाजपच्या या घोषणेला विरोध केलाय. महाराष्ट्रात असल्या घोषणा चालत नसल्याचं त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय. या वक्तव्यावरुन भाजपमधील मतभेद उघड झाल्याचं कळताच त्यांनी घूमजाव केलंय.
महाराष्ट्राच्या प्रचारात भाजप नेत्यांनी बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है च्या घोषणा द्यायला सुरुवात केलीय. भाजप नेत्यांच्या या प्रचारकी घोषणांवरुन भाजपमध्ये मतभेद समोर आलेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बटेंगे तो कटेंगेसारख्या घोषणा महाराष्ट्रात चालणार नाहीत अशी भूमिका मांडलीये. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली.
मी स्पष्टपणे सांगते माझं राजकारण वेगळं आहे.केवळ माझ्या पक्षाच्या नेत्यानं हे वक्तव्य केलं म्हणून मी पाठिंबा देणार नाही.माझी अशी धारणा आहे की आपण विकासावर काम करायला पाहिजे.नेत्यांना सर्व नागरिक समान असले पाहिजे.त्यामुळे महाराष्ट्रात अशा घोषणा चालणार नाहीत.योगी आदित्यनाथ यांनी वेगळ्या संदर्भात आणि वेगळ्या परिस्थितीमध्ये उत्तर प्रदेशात हे वक्तव्य केलं आहे.त्याचा आपण अर्थ घेत आहोत तसा नाही.मोदींनी सर्वांचा विकास केला आहे. विकासात कुठलाही भेदभाव केला नाही.
पंकजांच्या या वक्तव्यावरुन भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याचा टोला नाना पटोलेंनी लगावलाय.पंकजा मुंडेंनी मांडलेल्या रोखठोक भूमिकेचं संजय राऊतांनी स्वागत केलं.बटेंगे कटेंगेच्या वक्तव्याची चर्चा झाल्यानंतर पंकजांनी कथित वक्तव्यावरुन घूमजाव केलंय. आपण ऑन रेकॉर्ड कुठंच बोललो नाही असं पंकजा म्हणाल्यात.
पंकजांनी घूमजाव केलं असलं तरी महाराष्ट्राच्या निवडणुकीत बटेंगे कटेंगे आणि एक है तो सेफ है अशा घोषणा चालणार नाही असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे हे अधोरेखित झालंय.
महाराष्ट्रात महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली. त्यामुळं बीड जिल्ह्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे भाऊबहीणीचं मनोमिलन झालं. या मनोमिलनाचा आनंद सामान्यांना झाला. पण वर्षानुवर्ष राष्ट्रवादीच्या विरोधात राजकारण करणाऱ्या अनेक नेत्यांना विस्थापित होण्याची वेळ आलीय. येत्या दिवसांत भाजपमधील अनेक नेते हाती तुतारी घेण्याची शक्यता निर्माण झालीय.बीड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ घातलीय. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भाऊबहिणींच्या राजकीय मनोमिलनानं भाजपमधील अनेक प्रस्थापितांवर विस्थापित होण्याची वेळ आलीय. बीड भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी कमळ सोडून हाती तुतारी घेतलीये. ही फक्त सुरुवात असून पुढच्या दहा दिवसांत बीड भाजपमधून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग होण्याची शक्यता आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी तसे संकेत दिलेत.वर्षानुवर्षे राष्ट्रवादीविरोधी राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची महायुतीमुळं राजकीय अडचण झालीय. माजी आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे , माजी आमदार संगीता ठोंबरे, माजी आमदार रमेश आडसकर अस्वस्थ आहेत. यातले सुरेश धस यांच्यासारखे काहीजण शेवटची आशा म्हणून मुंबईवारी करुन पक्षातून पुनर्वसन केलं जाईल या आशेवर आहेत.