पेट आणि एलएलएमच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाकडून मोठी अपडेट!

PET and LLM Exam: पेट परीक्षेसाठी एकूण 4960 एवढ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Nov 14, 2024, 07:14 PM IST
पेट आणि एलएलएमच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाकडून मोठी अपडेट! title=
पेट एलएलएम परीक्षा

PET and LLM Exam: मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या पी.एच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा (पेट) 2024 आणि एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन ईमेलवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या दोन्ही परीक्षांचे आयोजन दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी विविध केंद्रांवर करण्यात आले आहे. 

पेट परीक्षेसाठी एकूण 4960 एवढ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. तर एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेसाठी 4496 एवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. या दोन्ही परीक्षा सेंटर बेस्ड टेस्ट ( सीबीटी) ऑनलाइन पद्धतीने विविध केंद्रांवर घेतल्या जाणार आहेत. पेट परीक्षा सकाळच्या सत्रात 10.30 ते दुपारी 12.30 या दोन तासाच्या कालावधीत होणार असून एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा दुपारी 3 ते 4 या एक तासाच्या कालावधीत घेतली जाणार आहे. परीक्षार्थींनी परीक्षेच्या 1 तासाआधी संबधित परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याचे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.

विद्यार्थी, पालकांच्या निवडणूक साक्षरतेसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार, घेतले 5 महत्वाचे निर्णय!

पेट 2024 च्या परीक्षेसाठी एकूण 4960 एवढे अर्ज प्राप्त झाले असून यापैकी सर्वाधिक विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी 2285 अर्ज प्राप्त झाले असून त्याखालोखाल मानव्य विद्याशाखेसाठी 1099, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेसाठी 813 आणि आंतरविद्याशाखेसाठी 763 एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच या एकूण अर्जांमध्ये विद्यार्थींनी 2804 तर विद्यार्थी 2155 आणि थर्ड जेंडर 1 अर्ज प्राप्त झाला आहे.

आशियाई क्रमवारीत मोठी झेप

मुंबई विद्यापीठाने गतवर्षीच्या तुलनेत सर्वच निकषात मोठी सुधारणा करत 291 ते 300 या बँडमधून बाहेर पडत थेट 245 क्रमांकावर झेप घेतली आहे. विद्यापीठाने मागील वर्षीच्या तुलनेत सर्वसाधारण गुणात उल्लेखनिय कामगिरी करत 19 गुणांवरून 34 गुण प्राप्त केले आहेत. तर दक्षिण आशिया क्रमवारीत उत्कृष्ट कामगिरी करत 67 क्रमांकावरून 52 क्रमांक पटकावला आहे. नुकतीच आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठाची मोहोर उमटली आहे.क्युएसच्या विविध 11 निकषात मुंबई विद्यापीठाने सर्वाधिक पेपर्स पर फॅकल्टी निकषात सर्वाधिक 90.6 गुण प्राप्त केले आहेत. त्यापाठोपाठ नियोक्ता प्रतिष्ठा 64.1, शैक्षणिक प्रतिष्ठा 34.6, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी गुणोत्तर 32.6, आंतरराष्ट्रीय संशोधन नेटवर्क 21.3, विद्याशाखा-विद्यार्थी गुणोत्तर 14.2, आंतरराष्ट्रीय विद्याशाखा गुणोत्तर 9.1, पीएचडी असलेले शिक्षक 4.8, सायटेशन पर पेपर 3.8, आऊटबॉऊंड एक्सचेंज स्टूडेंट्स 1.1 आणि इनबॉऊंड एक्सचेंज स्टुडेंट 1 अशा विविध निकषात विद्यापीठाने उत्तम कामगिरी केली आहे.