नवी दिल्ली : आर्मेनिया आणि अजरबैजान यांच्यातील संघर्ष बुधवारी आणखी वाढला. नागोर्नो-करबखच्या फुटीरवादी भागात हल्ल्यांचा आरोप दोन्ही बाजूंनी एकमेकांवर केला गेला. रशियाच्या मध्यस्थीनंतर केलेल्या युद्धविराम कराराचा कोणताही परिणाम दिसून येत नाहीये. लढा तिसऱ्या आठवड्यातही सुरू आहे. दरम्यान आता तेल आणि गॅस पाईपलाईनला लक्ष्य केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, असे झाल्यास मोठं संकट निर्माण होऊ शकतं.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी तुर्कीचे रेसेप तैयप एर्दोगन यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. युद्धबंदी कराराचे उल्लंघन करण्याऐवजी ते पाळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. मिडल इस्टचे दहशतवादी या संघर्षात सामील असल्याची चिंताही पुतीन यांनी व्यक्त केली. त्याच वेळी तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांनी या भागात सैनिक तैनात करण्यास नकार दिला, परंतु सीरियन आधारित विरोधी कार्यकर्त्यांनी पुष्टी केली की तुर्कीने शेकडो लढाऊ नागोर्नो-करबख येथे पाठवले आहेत.
वाढत्या तीव्र संघर्षाच्या दरम्यान, अजरबैजानच्या सैन्याने दावा केला आहे की, त्यांनी अर्मेनियाचं एक मिसाईल यंत्र नष्ट केलं आहे. हे नागरी भागात पाडण्याचा त्यांच्या विचार होता. दुसरीकडे, आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाने असे म्हटले आहे की, ते अजरबैजान सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी होते. आत्तापर्यंत, आर्मेनिया आणि अजरबैजान यांनी एकमेकांच्या प्रदेशाला लक्ष्य करण्यास नकार दिला आहे. परंतु परिस्थिती अशी बनली आहे की, या दोन देशांमधील शत्रुत्व अधिक धोकादायक बनू शकते.
आर्मेनियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अजरबैजानने हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या व्यतिरिक्त आर्मेनियानेही राजकीय दुष्परिणामांचा इशारा दिला आहे. परस्पर आरोप आणि दोन्ही बाजूंच्या धमक्यांमुळे धोरणात्मक सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.
अजरबैजानच्या कॅस्पियन समुद्रापासून तुर्की आणि पाश्चिमात्य बाजारात कच्च्या तेलाच्या पाईपलाईनबाबत चिंता व्यक्त होत आहे. अजरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हम अलीएव यांनी आर्मोनियाला गॅस, तेल पाईपलाईनचे नुकसान झाल्यास मोठी किंमत मोजावी लागेल अशी धमकी दिली आहे. दुसरीकडे, नागोर्नो-करबखमधील अधिकाऱ्यांनी अजरबैजानवर या भागातील रुग्णालयात गोळीबार केल्याचा आरोप केला आणि त्यास 'युद्ध अपराध' म्हटले. पण कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण अजरबैजान सैन्याने आर्मेनियाचा हा दावा नाकारला आहे.
27 सप्टेंबरपासून आर्मेनिया आणि अजरबैजान सैन्यांदरम्यान संघर्ष सुरू झाले. गेल्या चार शतकांमधील हा सर्वात मोठा संघर्ष आहे. शांततेसाठी अनेक प्रयत्न करूनही दोन्ही देश थांबत नाहीत. शनिवारी रशियाने युद्धबंदीचा करार केला. 10 तासांपेक्षा जास्त काळ झालेली चर्चा अयशस्वी ठरली. काही मिनिटांतच दोन्ही देशांमध्ये पुन्हा संघर्ष झाला आणि हा वाद अजूनही सुरू आहे.