हिवाळ्यात पपईचा ज्यूस प्यायल्याने शरीराला मिळतात 'हे' फायदे

पपई हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असल्याचं माहित आहे. पपईचा ज्यूस सुद्धा शरीरासाठी तितकाच लाभदायक आहे. जाणून घ्या, हिवाळ्यात पपईच्या ज्यूसचे सेवन केल्याचे फायदे.

Updated: Feb 4, 2025, 03:48 PM IST
हिवाळ्यात पपईचा ज्यूस प्यायल्याने शरीराला मिळतात 'हे' फायदे title=

Benefits of Papaya Juice: आपल्या रोजच्या आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देत असतात. फळांमधील आरोग्यदायी गुणधर्मांमुळे अनेकजण फळांचे सेवन करतात. कित्येकजण फळे खाण्यापेक्षा त्यांचा ज्यूस पिणं हे अधिक सोयीचं मानतात. फळांचा ज्यूस प्यायल्याने सुद्धा शरीराला बरेच फायदे मिळतात. शरीरासाठी लाभदायक असणाऱ्या फळांमध्ये पपई हे फळ सुद्धा लोक अगदी आवडीने खातात. चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी लाभदायक ठरणाऱ्या गुणधर्मांमुळे पपई हे फळ मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. पपईचा ज्यूस प्यायल्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. आपल्या आहारात पपईचा ज्यूस हा चांगला पर्याय ठरु शकतो. 

पपईमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अ‍ॅंटीऑक्सीडेंट्स असतात. त्यामुळे पपईच्या ज्यूसचे सेवन केल्याने शरीराला अधिक ऊर्जा मिळण्यास मदत होते तसेच बऱ्याच आजारांना आळा घालण्यास फायद्याचे ठरते. हिवाळ्यात पपईच्या ज्यूसचे सेवन शरीराला अधिक लाभदायक ठरते. जाणून घ्या, पपईचा ज्यूस पिण्याचे फायदे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास फायदेशीर

पपईमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी हे शरीरातील पांढऱ्या पेशींच्या वाढीसाठी कारणीभूत असते. याव्यतिरिक्त पपईमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सच्या समस्येपासून वाचवतात. नियमितपणे पपईचा रस प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.

पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास मदत

पपईमध्ये असलेल्या पपेन एंझाइममुळे पचनास मदत होते. पपईमध्ये असलेल्या पपेन एंझाइमला पपई प्रोटीनेज असेही म्हणतात. पपईचा ज्यूस प्यायल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि अ‍ॅसिडीटी या पोटासंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. 

त्वचेसाठी फायदेशीर

पपईचा ज्यूस त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत करते. हे त्वचेतील डेड सेल्स काढून टाकून त्वचा उजळ करते आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. पपईचा ज्यूस प्यायल्याने त्वचा हायड्रेटेड राहते आणि त्वचेवरील डाग, पुरळ कमी होण्यास मदत होते. 

वजन कमी करण्यासाठी मदतशीर

बरेचजण वजन कमी करण्यासाठी विविध उपाय करतात. पपईचा ज्यूस हा वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. पपईमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असून फायबर हे भरपूर प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने पोट अधिक काळ भरलेले असल्याचे जाणवते आणि वारंवार भूक लागत नाही. तसेच, शरीरातील मेटाबॉलिजममध्ये वाढ होऊन वजन कमी करण्यास मदत होते. 

हे ही वाचा: चवीलाच नाही तर, आरोग्यासाठीसुद्धा गुणकारी असतो गरम मसाला; 'हे' 3 मोठे दुष्परिणामही वाचाच

 

 

डोळ्यांच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर

पपईमध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेले बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. पपईच्या ज्यूसचे सेवन केल्याने दृष्टीमध्ये सुधार होतो आणि मोतीबिंदू सारख्या समस्या टाळता येतात. नियमितपणे पपईच्या ज्यूसचे सेवन केल्याने डोळ्यांतील खकवा तसेच कोरडेपणा कमी केला जाऊ शकतो. 

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)