Shocking News 36 Flight Cancellations 200 Delays: जोरदार पाऊस, वादळ किंवा काही धमकी मिळाल्याने विमानाचे उड्डण रद्द करण्यात आल्याच्या बातम्या यापूर्वी तुम्ही अनेका ऐकल्या किंवा वाचल्या असतील. मात्र एका विचित्र कारणामुळे तब्बल 36 विमानांचं उड्डाण रद्द करावं लागल्याचा विचित्र प्रकार नुकताच समोर आला आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण एका कात्रीच्या सेटमुळे एवढी विमानं रद्द करावी लागली. नेमकं घडलं काय हे पाहूयात...
तर हा सारा प्रकार घडला तो जपानमधील न्यू किटोज विमानतळावर. शनिवारी म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी या विमानतळावर फारच विचित्र घटना घडली ज्यामुळे 36 विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं. जपानच्या सर्वात उत्तरेकडे असलेल्या होकाईओडो बेटावर असलेल्या न्यू किटोज विमानतळावर कात्रीसंदर्भातील नियम फार कठोर आहे. या विमानतळावर असलेल्या दुकानदारांनी त्यांच्याकडील कात्री फार जपून ठेवावी अशी सूचना या ठिकाणी फार पूर्वीपासून दिली जाते. खरं तर जपानमधील लोक हे जगभरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींची फार काळजी घेणारे म्हणून ओखळले जातात. त्यामुळेच येथील अनेक गोष्टी जगभरात कुठेच पाहायला मिळत नाहीत. असाच हा विमानतळावरील धारदार शस्त्रांसंदर्भातील नियम आहे. याच कारणाने कात्रीचा वापर करुन हल्ला होण्याची शक्यता असल्याने ही काळजी घेतली जाते.
शनिवारी याच दुकानांपैकी एका दुकानाच्या मालकाने त्याच्या दुकानातील लॉकरमधून कात्रीचा एक जोड बेपत्ता असल्याचं विमानतळ व्यवस्थापकांना कळवलं. यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला आणि या हरवलेल्या कात्रीच्या सेटचा शोध सुरु झाला. हा शोध सुरु करताना सर्वात आधी विमानतळावर बाहेरुन प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना प्रवेशबंदी करण्यात आली. म्हणजेच विमानतळामधील लोक आत आणि बाहेरील प्रवासी बाहेरच राहतील अशी काळजी घेत तपास सुरु झाला. विमानतळाबाहेर प्रवाशांना तब्बल 2 तास थांबवण्यात आलं होतं. त्यामुळेच विमानतळाबाहेर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या.
कात्रीचा हा सेट कोणी वाईट उद्देशाने चोरला तर नाही ना अशी भिती सुरक्षा अधिकाऱ्यांना वाटत होती. तसं असेल आणि हल्ला वगैरे झाला तर विमानतळावरील परिस्थिती अधिक बिघडू शकते, असं सांगितलं जातं होतं. तब्बल दोन तास सुरु असलेल्या या गोंधळामुळे या विमानतळावरुन उड्डाण घेणारी 36 विमानं रद्द करण्यात आली. दिवसभरात या प्रकरणाचा परिणाम थेट 200 उड्डाणांवर झाला आणि ही उड्डाणे नियोजित वेळेहून अधिक लांबणीवर पडली. या गोंधळामुळे विमानतळावरील कलाकारांच्या एका गटाला वेळेत त्यांच्या कार्यक्रमस्थळी पोहचता आलं नाही.
एका टीमने ज्या दुकानामधून कात्रीचा सेट चोरीला गेला आहे तिथेच शोध घेतला असता दोन्ही कात्री तिथेच सापडल्या आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.
सध्या जपानमध्ये ओबॉन नावाचा सण साजरा केला जात असल्याने प्रवाशांची संख्या अधिक आहे. या सणाच्या वेळी आपल्या पूर्वजांना आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र येत श्रद्धांजली अर्पण केली जाते. म्हणूनच अनेकजण प्रवासात असतानाच हा गोंधळ उडल्याने रद्द झालेली उड्डाणांची संख्या वाढली.