तेहरान : इराणच्या क्वाड्स फोर्सेसचे दिवंगत प्रमुख कासिम सुलेमानी यांची अंत्ययात्रा त्यांच्या मूळ गावी, करमान इथं पोहोचली. तेहरानप्रमाणेच करमानमध्येही लाखोंचा जनसमुदाय अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाला होता. यावेळी अनेक जण काळे कपडे घालून आले होते. 'अमेरिका मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या जात होत्या. अमेरिकेचा बदला घेण्याची भाषा सुरूच असताना आता हा बदला कशा प्रकारे घ्यायचा यावरही विचार विनमिय सुरू झाला आहे. निमसरकारी वृत्तसंस्था 'फार्स'नं इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सचिव अली शामखानी यांचं वक्तव्य जाहीर केलं आहे.
आतापर्यंत बदला घेण्याच्या १३ पद्धतींवर आम्ही चर्चा केली आहे, हे अमेरिकेनं जाणून घेतलं पाहिजे. यातली सर्वात कमी ताकदीची पद्धत वापरण्यावर एकमत झालं तरीही अमेरिकेसाठी ते ऐतिहासिक दुःस्वप्न ठरणार आहे. असं शामखानी यांनी म्हटलं आहे.
त्याच वेळी इराणच्या संसदेनं 'तिप्पट आणीबाणी'चं विधेयक मंजूर केलं आहे. सुलेमानींना ठार केल्यामुळे अमेरिकेची संरक्षण आस्थापना पेंटागॉनचा हात असल्याचं या ठरावात म्हटलं आहे. इराणमध्ये अशी बदल्याची भाषा सुरू असताना ट्रम्प प्रशासनानं इराणमधल्या ५२ महत्त्वाच्या स्थळांची यादीच जाहीर केली आहे. अमेरिकेविरोधात एकही पाऊल उचललं गेलं तर ही स्थळं नेस्तनाबूत केली जातील, अशी धमकी वॉशिंग्टनमधून आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या एक-दोन दिवसांमध्ये इराण एखादी मोठी लष्करी कारवाई करू शकतो, असं अमेरिका मानते आहे.
गुप्तहेरांमार्फत ही कारवाई काय असेल, ते जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू असला तरी अद्याप ठोस माहिती हाती आलेली नाही. आखातामध्ये सैन्याची कुमक आणखी वाढवण्याचं पाऊल अमेरिकेकडून उचललं जाऊ शकतं. तसंच आय फॉर अॅन आय या नात्यानं इराण एखाद्या वरिष्ठ अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याला लक्ष्य केलं जाऊ शकतं, असंही मानलं जातं आहे. भारतासह जगातल्या सर्वच देशांनी इराण आणि अमेरिकेला सबुरीचा सल्ला दिला आहे. तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक मार्गांचा वापर करण्याची विनंती केली आहे. मात्र सध्यातरी दोघंही सामोपचाराच्या मूडमध्ये दिसत नाहीयेत.