नवी दिल्ली : २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफीज सईद यानं भारताविरोधात पुन्हा गरळ ओकली आहे.
काश्मीरसाठी आपण उठवत असलेला आवाज बंद करण्यासाठी मला अटक करण्यात आली होती. मात्र, काश्मिरी जनतेसाठी आपण संपूर्ण पाकिस्तानातून लोकं जमा करू आणि काश्मिरींच्या स्वातंत्र्याचं लक्ष्य गाठू अशी धमकी हाफीज सईदने दिली आहे.
हाफीज सईदला मुक्त केल्यानंतर घरासमोर जमलेल्या नागरिकांसमोर त्याने भाषण दिलं. हाफीज सईदच्या सुटकेनंतर अमेरिकेनंही चिंता व्यक्त केली आहे.
दहशतवादी हल्ले करुन अमेरिकी नागरिकांसह शेकडो निष्पाप लोकांच्या मृत्यूला हाफीजची संघटना कारणीभूत ठरलीय. त्यामुळे पाकिस्तानने त्याला तात्काळ अटक करुन गुन्हे दाखल करावेत असा दम अमेरिकेनं पाकिस्तानला दिला आहे.
जानेवारी २०१७ मध्ये हाफिझ सईद आणि त्याच्या साथीदारांना नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं. सईदच्या नजरकैदेत वाढ करण्यात यावी अशी मागणी करत न्यायालयात पुरावे देण्यास पाकिस्तान सरकारला अपयश आलं. त्यानंतर न्यायालयाने हाफिज सईदची सुटका करण्याचे आदेश दिले.