अमेरिकेत ट्रम्प पर्वाला सुरुवात! शपथ घेताच आणीबाणी जाहीर; 10 महत्त्वाच्या घोषणा, निर्णयांचा सपाटा

Trump Sworn In As 47th US President: ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकीच्या राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर निर्णयांचा धडाकाच सुरु केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 21, 2025, 07:41 AM IST
अमेरिकेत ट्रम्प पर्वाला सुरुवात! शपथ घेताच आणीबाणी जाहीर; 10 महत्त्वाच्या घोषणा, निर्णयांचा सपाटा title=
शपथ घेताच निर्णयांचा सपाटा (फोटो - रॉयटर्सवरुन साभार)

Trump Sworn In As 47th US President: नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेतील सर्वजनिक निवडणुकीचे निकाल लागून अडीच महिने पूर्ण झाल्यानंतर आज डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी शपथ घेताच काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर काही आदेश जारी केले आहेत. ट्रम्प यांनी 20 जानेवारी हा अमेरिकेसाठी सुवर्ण युगाची सुरुवात करणारा दिवस असल्याचं म्हटलं आहे. 

अनेक आदेशांवर केली स्वाक्षरी

ट्र्म्प यांनी नव्या टर्ममधील पहिल्याच दिवशी अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये त्यांनी अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न नसेल असं जाहीर केलं आहे. तसेच ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये आजपासून केवळ महिला आणि पुरुष असे दोनच लिंग ओळखले जातील असंही जाहीर केलं आहे. ट्रम्प यांनी टीकटॉक व्हिडीओ अॅपवरील बंदी पुढे ढकलली आहे. ट्रम्प यांनी 2021 साली राजधानी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल येथे झालेल्या हल्ल्यातील सर्व दोषींना माफ करण्याचे आदेश जारी केले आहेत. यामुळे 1500 लोकांना देशमुक्त केलं जाणार आहे. ट्रम्प यांनी जन्मापासूनच अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याची तरतूदही रद्द केली आहे.

ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेताना दहा महत्त्वाच्या घोषणा केल्या. या घोषणा खालीलप्रमाणे:

> दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरच्या पहिल्याच भाषणात ट्रम्प यांनी, अमेरिकेच्या सुवर्ण युगाची सुरुवात झाली आहे, अशी घोषणा केली. 

> दक्षिण सीमेवर म्हणजेच मॅक्सिको आणि अमेरिका सीमेवर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. 

> ट्रम्प यांनी अमेरिका मॅक्सिको सीमेवर आणीबाणी घोषित केल्यानंतर दक्षिण सीमेवर लष्कर पाठवलं जाणार आहे.

> आपल्या पहिल्याच भाषणात ट्रम्प यांनी, ना संविधानाला विसरणार, ना देवाला विसरणार अशी घोषणा केली आहे.

> आजचा दिवस अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे, असंही ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या भाषणात म्हटलं आहे. 

> अमेरिकेच्या शत्रूंना पराभूत करण्यासाठी सैन्याला सूट देण्यात येत असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे.

> बेकायदेशीर मार्गाने आलेल्या प्रवाशांना ते जिथून आले आहेत तिथे पाठवलं जाणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय.

> मला शांतीदूत म्हणून ओळखलं जावं अशी माझी इच्छा असल्याचं ट्रम्प यांनी पहिल्याच भाषणात म्हटलं.

> मॅक्सिको बॉर्डरवर भिंत उभारली जाणार असल्याचं ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्ये केली.

> दुसऱ्या देशातून येणाऱ्या सामानावर कर आकारला जाणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.