मुंबई : काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर दररोज नवनवीन मार्गांनी पाकिस्ताकडून कुरापती करणं सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर इतर देशांनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची अपेक्षा असल्याचं पाकिस्तानच्या एकंदर हालचाली पाहून लक्षात येत आहे. मुख्य म्हणजे अनेक राष्ट्रांक़डून पाकिस्तानला दणका मिळत असतानाही हे शेजारी सुधारण्याचं नाव घेत नाही आहेत.
सध्याच्या घडीला नियंत्रण रेषेनजीक पाकिस्तानी सैन्यदलाने तोफा तैनात केल्या असून, दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण देण्याचं सत्रही सुरुच ठेवलं आहे. मंगळवारी दुपारपासून नियंत्रण रेषेपलीकडून पाकिस्तानच्या सैन्याने गोळीबार सुरु केला होता, ज्याचं भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं.
*पाकिस्तान सैन्यदलाकडून LoCवर मीडियम रेंज तोफा तैनात केल्या आहेत.
*LoCनजीक पाकिस्तान सैन्यदल आणि BATच्या हालचालीही वाढल्या आहेत.
*पाकिस्तानच्या सैन्यदलाकडून LoCवर SSGचे १०० जवान तैनात करण्यात आले आहेत.
*बांग्लादेशमधील हरिनमारा डोंगररांगांमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवरही मोठ्या प्रमाणावर हालचाली पाहायला मिळत आहेत.
*दहशतवादी तळांमध्ये रोहिंग्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून, आता त्यांचा असा वापर करण्यात येत आहे.
अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानकडून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तीन हवाई तळ पाकिस्तानकडून ३१ ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आले. पाकिस्तान सिव्हिल एविएशन अथॉरिटी (सीसीए)ने नोटीस जारी करत याविषयीची घोषणा केली. ज्यामध्ये पर्यायी मार्गांची माहितीही देण्यात आली आहे. या निर्णयाचा भारत- पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीशी कोणताही संबंध नाही, असं सीसीएकडून सांगण्यात आलं आहे.
पण, पाकिस्तानच्या एकंदर हालचाली आणि काश्मीरसाठी कोणत्याही थराला जाऊ, असं म्हणाऱ्या इम्रान खान यांची वक्तव्य पाहता येत्या काळात पाकिस्तानकडून त्यांच्या राष्ट्रातील हवाई तळ भारतासाठी पूर्णपणे बंद करण्यात येण्याची चिन्हं आहेत.