मुंबई : कोरोना संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने होऊ लागला आहे. कोरोनाची दुसरी लाट धोकादायक ठरत आहे. आतापर्यंत अनेक लोकांनी आपला जीव गमवला आहे. कोरोनामुळे जगभरात मृतांची संख्या 30 लाखांवर गेली आहे. जगात कोरोनाचा वाढता धोका पाहता आता अनेक देशांनी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
जगात सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरातील देश चिंतेत आहेत. त्यातच मृतांचा आकडा आता 30 लाखांवर गेला आहे.
जपाननेही आणखी दोन राज्यात आणीबाणी जाहीर केली आहे. टोकियो-ओसाका नंतर महामारी नियंत्रित होत नसल्याने क्योटो आणि ह्योगोमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली. रविवारी येथे साडेपाच हजाराहून अधिक रुग्ण आढळले. बार, स्टोअर व थिएटर बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जनतेने कठोर निर्बंधांचे पालन केले पाहिजे, असे जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केल यांनी म्हटले आहे. अर्थमंत्री ओलाफ स्कोल्झ म्हणाले की संसर्गाची अशीच परिस्थिती उद्भवल्यास मेच्या अखेरपर्यंत सर्व निर्बंध कायम ठेवावे लागतील.
भारतात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे बांगलादेशने 14 दिवसांसाठी भारताची सीमा सील केली आहे. बांगलादेशचे गृहमंत्री असद्दुजमान खान यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिकेच्या जोन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, जगभरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृतांचा आकडा 30 लाख 96 हजारांवर पोहोचला आहे.