Britain Bill Gates Dead Body Found In Sea: 'ब्रिटनचे बिल गेट्स' म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योजक माईक लिंच यांचा मृतदेह समुद्राच्या तळाशी सापडला आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या 18 वर्षीय मुलीचाही मृतदेह बुडालेल्या आलिशान बोटीच्या मलब्यामधून बाहेर काढण्यात आला आहे. लक्झरी याच (बोट) बुडाल्यापासून या बाप-लेकीचा शोध सुरु होता. माईक लिंच यांच्या 'बायसीयन' या आलिशान बोटीला अपघात झाला तेव्हा त्यावर एकूण 22 जण होते. त्यापैकी 16 जणांना वाचवण्यात यश आलं. बचावलेल्या लोकांमध्ये लिंच यांची पत्नी अँजेला बॅकरसचाही समावेश आहे.
इटालीमधील सिसिली बेटाची राजधानी असलेल्या पालेर्मोजवळ माईक लिंच यांची 'बायसीयन' नावाची याच बुडाली. सोमवारी (19 ऑगस्ट 2024 रोजी) हा अपघात घडल्यापासून लिंच यांचा शोध सुरु होता. अखेर दोन दिवसांनंतर त्यांचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. 59 वर्षीय माईक लिंच यांना सॅन फ्रॅन्सिस्कोमधील कोर्टाने फसवणूक प्रकरणामध्ये मोठा दिलासा देत जून महिन्यात निर्दोष मुक्तता केली होती. आपल्या मालकीच्या सॉफ्टवेअर कंपनीच्या माध्यमातून झालेल्या विक्रीसंदर्भातील व्यवहारामध्ये घोळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या विजयानंतर लिंच यांनी याचवर काही जवळच्या लोकांना विशेष पार्टी दिली होती. त्याचवेळी हा अपघात झाला.
माईक लिंच यांच्याबरोबर या आलिशान बोटीवर त्यांची 18 वर्षांची मुलगी हॅना, मॉर्गन स्टॅनली या कंपनीचे अंतरराष्ट्रीय अध्यक्ष जॉनथन ब्लूमर, वकील ख्रिस मार्व्हिलो आणि त्यांच्या पत्नीही होत्या. हे सर्वजण सोमवारपासून बेपत्ता आहेत. आता स्कूबा डायव्हर्सबरोबरच हेलिकॉप्टर, जहाजांच्या सहाय्याने या बुडालेल्या व्यक्तींचे मृतदेह शोधण्यात आले.
अपघातानंतर बेपत्ता असलेल्यांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून सापडलेल्या मृतदेहांपैकी दोन मृतदेहांची ओळख पटलेली नाही. तर अन्य दोघांचा शोध अद्यापही सुरु आहे. 'द टेलीग्राफ'ने दिलेल्या वृत्तानुसार, 59 वर्षीय माईक लिंच आणि त्यांच्या मुलीचा मृतदेह बुडालेल्या 'बायसीयन' याचच्या एका केबीनमध्ये 'दोन गाद्यांदरम्यान अडकलेल्या' अवस्थेत बुधवारी सापडला.
माईक लिंच यांचा जन्म 1965 साली केम्सफोर्ट या लंडनजवळच्या शहरात झालेला. त्यांची आई नर्स तर वडील अग्निशामनदलामध्ये कार्यरत होते. माईक लिंच यांनी केंम्ब्रीज विद्यापिठातून फिजिक्स, गणित आणि बायोकेमिस्ट्रीचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी पीएचडी केली. माईक लिंच यांनी 1996 साली युनायटेड किंग्डममधील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी 'ऑटोनॉमी'ची स्थापना केली. पॅटर्न्ड अल्गोऱ्हीदमच्या माध्यमातून डेटा सर्च आि ऑर्गनाइज करण्याचं काम ही कंपनी करते. या कंपनीमुळेच त्यांना ब्रिटनचे बिल गेट्स असं नाव पडलं. ते त्यांच्या आलिशान लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. सुपरयाचबरोबरच अनेक महागड्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. माईक लिंच यांनी 2001 साली 'ऑटोनॉमी' कंपनी एचपी या कंपनीला विकली. मात्र यामध्ये लिंच यांनी आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप एचपीने केला. सन 2012 पासून माईक लिंच आणि जगप्रसिद्ध कंप्युटर कंपनी एचपीमध्ये सुरु असलेला हा खटला तब्बल 12 वर्ष न्यायप्रविष्ठ होता. सदर न्यायालयीन लढा 2024 च्या जूनमध्ये संपला. न्यायालयाने लिंच यांना दोषमुक्त केलं. याचसंदर्भात त्यांनी याचवर पार्टी ठेवली होती.
'फोर्ब्स'च्या अब्जाधिशांच्या यादीमध्ये माईक मिंच यांनी 2014 मध्ये प्रवेश केला. 2015 मध्ये त्यांची संपत्ती 1 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी होती. आजच्या घडीला ही रक्कम 8377 कोटी 80 लाख रुपये इतकी होते. मात्र 2016 मध्ये मिंच यांच्या संपत्तीत घट झाली.