ज्या प्रांतात तालिबान्यांनाही घुसण्याची भीती वाटते त्या 'पंचशीर'चं नाव आलं कुठून?

अजिंक्य अशा पंचशीरमध्ये घुसण्याआधी तालिबान्यांनाही का भरते धडकी... त्याला पांच शेरो की घाटी असं का म्हणतात?

Updated: Aug 26, 2021, 05:05 PM IST
ज्या प्रांतात तालिबान्यांनाही घुसण्याची भीती वाटते त्या 'पंचशीर'चं नाव आलं कुठून? title=

काबूल: अफगाणिस्तानातील पंजशीर असा एकमेव प्रांत आहे जिथे सोविएतच नाही तर तालिबानी देखील आपलं राज्य गाजवू शकले नाहीत. त्याचं हे स्वप्न सध्यातरी फक्त स्वप्नच राहिलं आहे. पंजशीर इथे नॉर्दन अलायन्सने तिथे कब्जा करण्यासाठी आलेल्या 300 तालिबान्यांना कंठस्नान घातलं. हा भाग म्हणजे नॉर्दन अलायन्सचा गड आहे. अफगाणिस्तानातील 34 प्रांतामधील हा एकमेव असा भाग आहे जिथे तालिबानी कब्जा मिळवू शकले नाहीत. 

70 ते 80 च्या दशकात सोविएतने देखील हा प्रांत आपल्या ताब्यात मिळवण्याचे सर्व प्रयत्न केले मात्र त्यांना यश मिळालं नाही. आता तालिबान जीव धोक्यात घालून हा प्रांत मिळवण्याच्या तयारीत आहे. पण या प्रांताला पंचशीर हे नाव आलं कुठून आणि तिथली परिस्थिती काय  असेल असा प्रश्न मानत येतो. 

पंजशीर म्हणजे पांच शेर असंही म्हटलं जातं. शेर म्हणजे सिंह 5 सिंहाचं बळ असलेला या अर्थानं या परिसराला हे नाव मिळालं आहे. यामागेही एक घटना आहे. अहमद मसूदचे वडील अहमद शाह मसूद यांना 'लायन ऑफ पंजशीर' असं म्हटलं जातं. ज्यांनी सोव्हिएत रशिया आणि तालिबान या दोघांनाही आपल्या पंजशीर प्रांतपासून दूर ठेवलं. त्यावर कब्जा मिळवू दिला नाही. पंजशीरचा अर्थ 'पाच सिंह' असा आहे. अफगाण सैन्याच्या एका जनरलचा मुलगा अहमद शाह मसूदचा जन्म पंजशीरमध्ये झाला.

काबुलच्या उत्तरेपासून 150 किलोमीटर दूर पंजशीर नावाची नदी आहे. हिंदुकुश पर्वतरांगा आहेत. तिथे एक महत्त्वपूर्ण महामार्ग आहे. जो हिंदुकुशपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात जवळचा मानला जातो. तिथे ताजिक जातीचे लोक राहतात. नूरिस्‍तानी, पशई समुदायाचे लोकही राहतात. साधारण इथली लोकसंख्या दीड लाख लोकांची असावी असंही सांगितलं जातं. 

अमेरिकेमुळे अफगाणिस्तानात थोडाफार विकास झाला होता. मात्र पंजशीर त्यापासून वंचितच राहिला होता. आजही इथल्या काही भागांमध्ये वीज आणि पाण्याचे प्रश्न भेडसावत आहेत. इथे एक रेडिओ टॉवर तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना सध्या रेडिओ ऐकता येत आहेत. इथले डोंगर म्हणजे इथल्या नागरिकांचं सुरक्षा कवच समजलं जातं.