फ्रान्समध्ये पतीने तब्बल 10 वर्षं अनोळखी लोकांना पत्नीवर बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी पतीविरोधात कोर्टात खटला दाखल कऱण्यात आला असून सुनावणी सुरु आहे. 26 ते 74 वयाच्या पुरुषांनी महिलेवर बलात्कार केले. महिलेला इतक्या प्रमाणात ड्रग्ज दिलं जात होतं की, तिला एक दशक हा प्रकार सुरु असल्याची कल्पना नव्हती. ही घटना उघड झाल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे.
आरोपी पतीने ऑनलाइन पद्धतीने 50 जणांना बलात्कार करण्यासाठी नियुक्त केलं होतं. 71 वर्षीय आरोपी पतीसह त्यांच्याविरोधातही खटला चालणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेवर 72 जणांकडून 92 वेळा बलात्कार करण्यात आला असून यामधील 51 जणांची ओळख पटली आहे.
न्यायाधीश रॉजर अराटा यांनी सर्व सुनावणी सार्वजनिक होतील असं जाहीर केलं आहे. तसंच महिलेला न्यायालयीन खटल्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण प्रसिद्धी देण्याची इच्छा मंजूर केली जाईल, असं तिचे वकील स्टीफन बॅबोन्यू यांनी सांगितलं आहे. "तिला जितकी शक्य आहे तितकी जागरुकता करायची आहे. तिच्यासोबत जे काही झालं ते इतर कोणासह होऊ नये अशी तिची इच्छा आहे," असंही त्यांनी सांगितलं.
तिचे आणखी एक वकील अँटोनी कामू म्हणाले की, तिच्यासाटी हा खटला म्हणजे एक भयंकर परीक्षा असेल. "पहिल्यांदा तिला मागील 10 वर्षात झालेल्या प्रत्येक बलात्काराबद्दल पुन्हा बोलावं लागणार आहे," असं ते म्हणाले. 2020 मध्ये महिलेला सर्वात आधी लैंगिक अत्याचाराबद्दल समजलं. त्याआधीच्या काही आठवणी तिच्याकडे नाहीत असं त्यांनी सांगितलं.
महिलेच्या तिन्ही मुलांनी तिला पाठिंबा दिला असून, खटला बंद दाराआड होऊ नये असी त्यांचीही इच्छा आहे. कारण असं करणं हीच आरोपींची इच्छा असेल असं ते म्हणाले आहेत.
पोलिसांनी प्रतिवादी, डॉमिनिक पी याची सप्टेंबर 2020 मध्ये चौकशी सुरु केली होती. त्याला एका सुरक्षारक्षकाने शॉपिंग सेंटरमध्ये तीन महिलांच्या स्कर्टखाली गुप्तपणे चित्रीकरण करताना पकडलं होतं. पोलिसांनी सांगितले की त्यांना त्याच्या संगणकावर त्याच्या पत्नीचे शेकडो फोटो आणि व्हिडिओ सापडले. ज्यामध्ये ती बेशुद्ध आणि नग्न अवस्थेत होती.
पोलिसांना coco.fr नावाच्या साइटवर चॅट्स देखील सापडले, ज्यामध्ये त्याने अनोळखी लोकांना त्यांच्या घरी येऊन त्यांच्या पत्नीशी सेक्स करण्यासाठी भरती केलं होतं. डॉमिनिक पीने अधिकाऱ्यांसमोर कबूल केलं की, त्याने आपल्या पत्नीला ड्रग्ज दिले होते.
2011 मध्ये या अत्याचाराला सुरुवात झाली होती. आदी ते पॅरिसजवळ राहत होते आणि दोन वर्षांनंतर ते माझानला गेल्यानंतरही सुरु राहिलं. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, पतीने बलात्कारात भाग घेतला, त्यांचे चित्रीकरण केले आणि इतर पुरुषांना अपमानास्पद भाषा वापरण्यास प्रोत्साहित केलं. यासाठी तो कोणतेही पैसे घेत नव्हता.
बलात्कार करणाऱ्या आरोपींमध्ये फोर्कलिफ्ट चालक, अग्निशमन दलाचा अधिकारी, कंपनीचा बॉस आणि पत्रकार यांचा समावेश आहे. यात काही अविवाहित, घटस्फोटित, तसंच कुटुंब असणारे पुरुष होते. बहुतेकांनी फक्त एकदाच भाग घेतला, परंतु काहींनी सहा वेळा भाग घेतला असं उघड झालं आहे. तज्ज्ञानुसार, महिला झोपेत असताना कोमाच्या जवळ होती. पतीने केलेल्या दाव्यानुसार, फक्त तिघेजण घरातून लवकर निघून गेले होते, इतरांनी मात्र तिच्यासह शारिरीक संबंध ठेवले.