Kolhapur News: एका बाजूला बुलढण्यात टक्कल पडण्याने लोक हैराण असताना कोल्हापुरात मात्र एका व्यक्तीने टक्कलवर औषध मिळाल्याचा दावा केला आहे. त्यामुंळ एकाएकी या व्यक्तीकडे केस गळतीमुळं हैराण झालेल्या नागरिकांनी एकच रांग लावली. केस गळतीमुळं त्रासलेल्या व्यक्तींवर सलमान नावाचे वैद्य उपचार करत आहेत. या सलमान वैद्य बुवांची चर्चा चांगलीच गाजत असताना सलमानवर महापालिकेने कारवाई केली आहे.
कोल्हापुरात टक्कलग्रस्तांना जडीबुटी आयुर्वेदिक तेल लावणाऱ्या सलमानवर महापालिकेने कारवाई केली आहे. गेली आठ दिवस सलमान कोल्हापुरातील महावीर गार्डनमध्ये टक्कलग्रस्तांना केस येण्यासाठी मोफत आयुर्वेदिक तेल लावत होता, सलमानचे आयुर्वेदिक तेल लावण्यासाठी टक्कलग्रस्तांनी देखील मोठी गर्दी केली होती. या संदर्भातील बातम्या आल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेला तब्बल आठ दिवसानंतर जाग आली आहे.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आक्षेप घेत सलमानकडे आयुर्वेदिक तेलासंदर्भात विचारपूस केली, त्याचबरोबर टक्कलग्रस्तांना लावत असलेल्या आयुर्वेदिक तेलाच्या संशोधनासंदर्भात पुरावे सादर करण्याचे सलमानला आदेश दिले. या पुढे महावीर गार्डनमध्ये टक्कलग्रस्तांना तेल न लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. इतकच नाही तर फुकट औषध मिळत आहे म्हणून आपल्या जीवाशी खेळू नये असं आवाहन देखील कोल्हापूर महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे.
यावेळीकारवाईसाठी आलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांना औषध लावून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी रोखले. त्याचबरोबर बाजारात हजार रुपये घेऊन बोगस औषध लावली जात आहेत. त्या ठिकाणी कारवाई करा असं टक्कल पडलेल्या नागरिकांनी महानगरपालिकेला खडे बोल सुनावले आहेत. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील महानगरपालिका आणि पोलिसांना सुनावत आमच्या जबाबदारीवर आम्ही औषध लावून घेवू अशी भूमिका मांडली आहे.
सलमानवर महानगरपालिकेने कारवाई जरी केली असली तरी त्याच्या औषधाचा गुण येत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. भल्या पहाटेपासून ते औषध घेण्यासाठी महावीर उद्यानात रांगा लावत आहेत. सलमान जाडीबुटी पद्धतीची क्रीम ब्रशने तो केसांना लावत आहे.त्याचा रिझल्ट आल्याचे अनेकजण सांगत असून त्यामुळे दिवसेंदिवस ही गर्दी वाढत आहे. या उपचार पद्धतीचा झपाट्याने प्रसार होत असून महावीर उद्यानात गेल्या काही दिवसांपासून टक्कल ग्रस्त गर्दी करत असून ती आता अवरणेही आता कठीण झाले आहे.