Did You Know: ट्रकची काही चाकं हवेत लटकत का असतात? कारण समजल्यावर भुवया उंचावतील

Why Trucks Have Hanging Tires: तुम्हीही अनेकदा प्रवासादरम्यान अशी हवेत चाकं असणारे ट्रक पाहिले असतील. सर्व चाकं जमीनीवर आणि काही चाकं हवेत अशी या ट्रकची रचना का असते याबद्दलचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

स्वप्निल घंगाळे | Updated: May 23, 2023, 04:31 PM IST
Did You Know: ट्रकची काही चाकं हवेत लटकत का असतात? कारण समजल्यावर भुवया उंचावतील title=
Why Trucks Have Hanging Tires (फोटो - Youtube वरुन साभार)

Why Trucks Have Hanging Tires: एक्सप्रेसवेने असेल किंवा घाटांमध्ये तुम्ही अनेकदा मोठ्या आकाराचे ट्रक (Trucks) हळूहळू मार्गक्रमण करताना पाहिले असतील. यापैकी काही गाड्यांना 4 हून अधिक चाकं असतात. खास करुन जास्त वजन वाहून नेणाऱ्या ट्रकला जास्त चाकं असतात. अनेकदा अशा जास्त लांबीच्या ट्रकला 8 किंवा 16 चाकं असतात. असे मोठे ट्रक मालवाहू ट्रकच असतात. मात्र यापैकी अनेक ट्रक्सची अतिरिक्त चाकं तुम्ही कधी पाहिली आहेत का? यापैकी अनेक चाकं ही जमीनीपासून थोडी वर असतात. म्हणजेच या चाकांवर ट्रकचा भार नसतो. पण ही चाकं अशी का लावली जातात? 

ही चाकं शो म्हणून नसतात..

हवेत काही चाकं असलेले ट्रक तुम्हीही कधी ना कधी प्रवासादरम्यान पाहिले असतील. हे ट्रक आणि जमीनीमध्ये काही अंतर ठेवलेलं असतं. म्हणजेच ही त्या ट्रकची सक्रीय चाकं नसतात. मग जर या चाकांचा वापर ट्रकचा भार उचलण्यासाठी केला जात नाही तर ती अशापद्धतीने का लटकवलेली असतात? खरं तर ही चाकं इतर मुख्य चाकांप्रमाणे ट्रकचा भार झेलत नसतील तर ती काढूनच का टाकत नाहीत? असे अनेक प्रश्न तुम्हालाही ही चाकं पाहिल्यावर पडत असतील. अशाप्रकारे हवेतील चाकं पाहून थोडं ऑड वाटतं आणि बरेच प्रश्नही पडतात. मात्र ही चाकं केवळ दिखावा म्हणून लावलेली नसतात.

का असतात ही चाकं हवेत?

जास्त लांबीच्या ट्रकमध्ये जी लटकणारी चाकं दिसतात त्यांना ड्रॉप अ‍ॅक्सेल किंवा लिफ्ट अ‍ॅक्सेल असं म्हणतात. आता अ‍ॅक्सेल म्हणजे काय हे गाडीचं बेसिक ज्ञान असणाऱ्यांना ठाऊक असेल. मात्र ज्यांना याबद्दल कल्पना नाही त्यांच्यासाठी अ‍ॅक्सेल म्हणजे काय हे अगदी सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगायचं झाल्यास, गाडीची दोन चाकं ही एका धातूच्या लांबलचक रॉडने जोडलेली असतात. दोन बाजूच्या चाकांना जोडणाऱ्या धातूच्या या रॉडलाच अ‍ॅक्सेल म्हणतात. हा अ‍ॅक्सेल फिरला की गाडीची चाकं फिरतात. आता यावरुन तुम्हाला या चाकांना ड्रॉप अ‍ॅक्सेल का म्हणतात याचा अंदाज आला असेल. मोठा चढ असेल किंवा आवश्यकता असेल तेव्हा चालक एका बटणाच्या सहाय्याने ही चाकं जमीनीला टेकवू शकतो. म्हणजेच गाडीच्या चाकांची संख्या या ड्रॉप अ‍ॅक्सेलमुळे वाढते किंवा कमी होते. गरज संपली की पुन्हा बटणाच्या मदतीने त्यांना वर घेतलं जातं. मात्र ही चाकं सतत जमीनीवर का नसतात?

मग ही चाकं कायम जमीनीवर का नसतात?

मालवाहू ट्रकबद्दल सांगायचं झाल्यास ट्रकला जितके अधिक अ‍ॅक्सेल असतात तितक्याच जास्त वजनाचे सामान ट्रकमधून वाहून नेता येतं. मात्र त्याचवेळी याचा एक डिसअ‍ॅडव्हानटेजही असतो. जास्त अ‍ॅक्सेल असल्याने ट्रकच्या वेगावर मर्यादा येतात आणि ट्रक सहपणे चालवणेही शक्य होतं नाही. जास्त चाकं सतत वापरली तर गाडीच्या देखभालीचा खर्चही वाढतो. त्यामुळेच पूर्ण क्षमतेने जेव्हा ट्रकमध्ये वजन भरलं जातं तेव्हाच या स्पेअर चाकांचा म्हणजेच ड्रॉप अ‍ॅक्सेलचा वापर केला जातो. गरज नसेल किंवा वजन जास्त नसेल तेव्हा ड्रॉप अ‍ॅक्सेल वापरले जात नाहीत आणि ते जमीनीपासून काही अंतरावर वर हवेत तंरगलेल्या अवस्थेत ठेवले जातात.