Mumbai Police Suggestion On Javlies Ka Message: सोशल मीडियावरुन ओळख करुन फसवणूक करण्याचे प्रकार मागील काही काळापासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सेक्स्टॉर्शन, खंडणी, ऑनलाइन फसवणूकसारख्या गोष्टी अशा अनोळखी लोकांकडून केल्या जातात. अशाप्रकारे ऑनलाइन माध्यमातून अनोळखी लोकांशी बोलू नये असं सांगितलं जातं. मात्र अनेकदा तरुण अनोळखी मुलींशी ओळख करण्याच्या उद्देशाने समोरुन मेसेजला रिप्लाय येत नसलं तरी बऱ्याचदा मेसेज करुन त्रास देत असतात. ओळख नसतानाही अशाप्रकारे मुलींना त्रास देणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांनी सूचकपद्धतीने इशारा दिला आहे.
मुंबई पोलिसांनी आपल्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर एका चॅटचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये मेसेज करणारी व्यक्ती 1 जुलै रोजी हाय आणि हे असे दोन मेसेज पाठवले. म्हणजेच एखाद्याबरोबर संवाद सुरु करण्यासाठी ऑनलाइन माध्यमातून जसा संवाद सुरु होतो तसं यामध्ये दिसत आहे. मात्र या मेसेजला समोरुन कोणताही रिप्लाय आल्याचं स्क्रीनशॉटमध्ये दिसत नाही. त्यानंतर 2 जुलै रोजी याच खात्यावरुन हॅलो आणि जेवलीस का? असे दोन मेसेज पाठवले जातात. त्यानंतर 'यू ब्लॉक दिस कॉनटॅक्ट' असं नोटीफिकेशन दाखवण्यात आलं आहे. "सर्वच जागी अशाप्रकारे अगाऊपणे पुढाकार घेणं योग्य नसतं," अशी कॅफ्शन या फोटोला दिली आहे. तसेच पुढे, "ती मस्त घरी जेवण करेल. तुमच्या अनाठायी काळजीची गरज नाही," असा खोचक सल्ला पोलिसांनी दिला आहे.
ही पोस्ट शेअर करताना पोलिसांनी अशा लोकांना ब्लॉक करुन टाका, प्रत्येक अनोळखी व्यक्तीच्या मेसेजला रिप्लाय करु नका, सुजाण नागरिक व्हा, सावध राहा असे हॅशटॅगही पोलिसांनी वापरले आहेत. मुंबई पोलिसांचा हा मेसेज योग्य पद्धतीने त्यांना फॉलो करणाऱ्यांपर्यंत पोहोचल्याचं या पोस्ट खालील कमेंट्स वाचल्यावर लक्षात येतं. अनोळखी व्यक्ती जेवलीस का प्रश्न विचारल्यावर कसं उत्तर द्यायचं यावर पोलिसांनी सुचवलेला थेट ब्लॉक करण्याचा मार्ग फारच उत्तम वाटला आहे.
या छोट्या आणि सूचक पोस्टच्या माध्यमातून पोलिसांनी अनोळखी लोकांशी कारण नसताना संवाद साधत बसू नका असा सल्ला दिला आहे. अशाप्रकारे अनेकजण अडचणीत येतात. मुंबई पोलिसांचं हे क्रिएटीव्ह पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जाणारी ही जनजागृती उत्तम असल्याचं एकाने म्हटलं आहे. मुंबई पोलीस अनेकदा तरुणीच्या भाषेत आणि मिम्सच्या माध्यमातून अगदी सूचक पद्धतीने तरुणांमध्ये सायबर सुरक्षा, कायद्याबद्दलची माहिती पोहोचवत असतात.