World Cup 2023 Points Table: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतील 20 व्या सामन्यातील निकालाने पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठा उलथापालथ झाली आहे. मुंबईमधील वानखेडे मैदानात शनिवारी खेळवण्यात आलेल्या दक्षिण अफ्रिका विरुद्ध इंग्लंड सामन्यात नेदरलॅण्डकडून पराभूत झालेल्या दक्षिण आफ्रिकेने विद्यमान विजेत्या संघाचा धुव्वा उडवला. दक्षिण अफ्रिकेने इंग्लंडसमोर 400 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इंग्लंडचा संघ 22 ओव्हरमध्ये अवघ्या 170 धावांवर तंबूत परतला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने 229 धावांनी जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे आज म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी आमने-सामने येत असलेल्या न्यूझीलंड आणि भारताचंही टेन्शन वाढलं आहे. जाणून घेऊयात हे टेन्शन वाढण्यामागील नेमकं कारण काय आहे.
हेनरिक क्लासेनला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याने 67 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली. तर जेराल्ड कोएत्झीने (Gerald Coetzee) 3 महत्त्वाच्या विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. या मोठ्या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने आपल्या नेट रन रेटमध्ये मोठी झेप घेतली आहे. केवळ 3 सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेने अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंड आणि भारतालाही नेट रन रेटसंदर्भात मागे टाकलं आहे. दुसरीकडे हा दारुण पराभव झाल्याने इंग्लंड पॉइण्ट्स टेबलमध्ये अगदी शेवटून दुसऱ्या क्रमाकांवर पोहोचला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी 1.385 इतकं होतं. जे इंग्लंडला पराभूत केल्यानंतर अगदी 2.210 पर्यंत पोहोचलं आहे. विशेष म्हणजे 4 सामने जिंकून न्यूझीलंड आणि भारताचा नेट रन रेटही इतका नाही. सध्या पहिल्या स्थानी न्यूझीलंडचा संघ आहे. दोन्ही संघांनी आपआपले चारही सामने जिंकले असूनही भारत दुसऱ्या स्थानी तर न्यूझीलंड पहिल्या स्थानी आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे नेट रन रेट. भारताचा नेट रन रेट +1.659 इतका आहे. तर न्यूझीलंडचा नेट रन रेट +1.923 इतका आहे. त्यामुळेच न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र या दोघांपेक्षा दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट या सर्वात मोठ्या विजयामुळे जास्त असला तरी विजयी सामन्यांच्या संख्येनुसार दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानी आहे. भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात जो संघ पराभूत होईल तो थेट तिसऱ्या स्थानी फेकला जाण्याची शक्यता कमी असली तरी स्पर्धेच्या दृष्टीकोनातून दक्षिण आफ्रिकेच्या नेट रन रेटमुळे पराभूत संघांची चिंता नक्कीच वाढणार आहे.
नक्की वाचा >> विराटची शतकाची हाव भारताला महागात? ...तर Points Table मध्ये झाली असती मोठी उलथापालथ
दक्षिण आफ्रिकेच्या आधी ऑस्ट्रेलियाने आपला पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्याने त्यांनी चौथ्या स्थानी झेप घेतली होती. त्यामुळे पाकिस्तानचा संघ अव्वल 4 मधून बाहेर पडला. दुसरीकडे इंग्लंडने आपल्या 4 सामन्यांपैकी तिसरा सामना गमावल्याने ते तळाशी फेकले गेले आहेत. इंग्लंड पॉइण्ट्स टेबलमध्ये 9 व्या स्थानी असून त्यांच्या खाली केवळ अफगाणिस्तानचा संघ आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याआधी इंग्लंड सहव्या स्थानी होता.
इंग्लंडला पहिल्या सामन्यामध्ये न्यूझीलंडने 9 धावांनी पराभूत केलं होतं. तेव्हापासूनच इंग्लंडच्या संघाला घरघर लागली आहे. या पराभवानंतर जॉस बटलरने आम्ही फारच सुमार कामगिरी केली. गोलंदाजांनी 340 ते 350 पर्यंत आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखायला हवं होतं असं बटलरने म्हटलं आहे.