MS Dhoni: आयपीएलचा यंदाचा सिझन आता शेवटच्या टप्प्यात आहे. या सिझनमध्ये गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला प्लेऑफ गाठणं शक्य झालं नाही. अनेकांच्या म्हणण्यानुसार, चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हा यंदाचा शेवटचा आयपीएल सिझन आहे. मात्र अजूनही अधिकृतरित्या निवृत्तीची घोषणा केली नाही. त्यामुळे पुढच्या सिझनमध्येही धोनी खेळणार का, असा सवाल अजूनही चाहत्यांच्या मनात आहे. दरम्यान यावर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) काशी विश्वनाथन यांनी मोठं विधान केलं आहे.
सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले की, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एक खेळाडू म्हणून इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मध्ये सहभागी होईल अशी मला आशा आहे. सीएसकेला पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या धोनीने या सिझनच्या सुरुवातीच्या एक दिवस आधी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि ही जबाबदारी ऋतुराज गायकवाड यांच्याकडे सोपवली.
CSK या यंदाच्या सिझनच्या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर होती. धोनीचा हा स्पर्धेतील शेवटचा सिझन असू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. पण विश्वनाथन यांच्या म्हणण्यानुसार, भारताचा माजी कर्णधार धोनीच्या भविष्याचा अंतिम निर्णय घेणं हे सर्वस्वी अवलंबून आहे. CSK च्या यूट्यूब चॅनलवर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात विश्वनाथन म्हणाले, 'मला माहित नाही. हा एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर फक्त MS धोनीचं देऊ शकतो. एमएसच्या निर्णयाचा आम्ही नेहमीच आदर केला आहे. त्यामुळे या गोष्टी आम्ही त्याच्यावर सोडल्या आहेत.
काशी विश्वनाथन पुढे म्हणाले की, तुम्हा सर्वांना माहितीये की, त्याने नेहमीच त्याचे निर्णय घेतले आहे. मुख्य म्हणजे योग्य वेळी तो त्याचे निर्णय जाहीर करतो. आम्हाला आशा आहे की, जेव्हा धोनी याबाबत निर्णय घेईल तेव्हा आम्हाला त्याची माहिती असेल. आम्हाला पूर्ण आशा आहे की तो पुढील वर्षी सीएसकेसाठी उपलब्ध असेल.
गेल्या वर्षी एम एस धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर धोनीने या सिझनमध्ये एकूण 161 रन्स केले आहेत. वर्षाच्या अखेरीस आयपीएलचा मेगा लिलाव होणार असून धोनी कायम राहिला तर सीएसके त्याला कायम ठेवेल यात शंका नाही. चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. लीग स्टेजच्या सामन्यांमध्ये आरसीबीकडून पराभव झाल्याने चेन्नईला प्लेऑफ गाठता आली नाही.