Suryakumar Yadav On Win Over Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेमध्ये विजयाने सुरुवात केल्यानंतर टीम इंडियाचा टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेलं एक विधान चर्चेत आहे. शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये भारताने 43 धावांनी विजय मिळवला. हा श्रीलंकेतील भारताचा टी-20 मधील सर्वात मोठा विजय ठरला आहे. असं असतानाही सूर्यकुमार यादवने फूल टाइम कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी मिळाल्यानंतरचा पहिला विजय हा नशिबामुळे मिळाल्याचं विधान केलं आहे. याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर बोलताना सूर्यकुमारने सामन्याच्या सुरुवातीपासून सामन्यावर आमची पकड होती असं मला वाटत होतं. अगदी श्रीलंकेने उत्तम सुरुवात केल्यानंतरही आमची सामन्यावर घट्ट पकड असल्याचं मला वाटत होतं, असं सूर्यकुमार म्हणाला. मैदानामध्ये दव अजिबात नसल्याने गोलंदाजांना फारसं यश मिळत नव्हतं. श्रीलंकेची धावसंख्या 149 धावांवर दोन गडी बाद अशी होती. मात्र त्यानंतर श्रीलंकेने 21 धावांमध्ये 8 विकेट्स गमावल्या आणि सामना भारताने जिंकला.
विजयानंतर सूर्यकुमार यादवने नशिबाने जिंकल्याचं म्हटलं. "आम्ही नशिबवान होतो की मैदानात दवं नव्हतं. आम्ही ज्या पद्धतीने वर्ल्ड कपमध्ये खेळलो आहोत त्यावरुन सामना अगदी शेवट होईपर्यंत संपलेला नसतो हे शिकलो आहोत," असं सूर्यकुमार म्हणाला. सूर्यकुमार यादवने या सामन्यामध्ये 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कारही पटकावला. त्याने तुफान फलंदाजी करताना 26 बॉलमध्ये 58 धावा केल्या. सूर्यकुमारने श्रीलंकन संघाच्या फलंदाजांचं कौतुक केलं. त्यांनी उत्तम फलंदाजी केली. मात्र सामना जसा पुढे जाईल तशी खेळपट्टी संथ होईल यावर आपल्याला विश्वास होता आणि तसेच घडल्याचं सूर्यकुमार म्हणाला.
"पहिल्या चेंडूपासून ते उत्तम खेळ करत होते. त्यांची धावगती उत्तम होती. त्यांना श्रेय दिलं पाहिजे. रात्रीच्या वेळी खेळपट्टी महत्त्वाच भूमिका बजावते हे आपल्याला ठाऊक आहे," असं सूर्यकुमार म्हणाला. श्रीलंकन कर्णधार चरित असलंकाने मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी निराशा केल्याचं म्हटलं. मात्र शेवटच्या काही ओव्हरमध्ये त्यांनी भारताला मोठा स्कोअर करण्यापासून रोखल्याबद्दल त्याने समाधानही व्यक्त केलं.
भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यामध्ये टी-20 बरोबरच एकदिवसीय सामने आणि कसोटी सामनेही खेळणार आहे. गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतरचा हा पहिलाच दौरा असल्याने याकडे बीसीसीआयबरोबरच चाहत्यांचंही विशेष लक्ष आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजीही उत्तम झाल्याने भारतीय संघामध्ये पुढील सामन्यात काही बदल होण्याची शक्यता कमीच मानली जात आहे.