मोहाली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये टीम इंडियाचा ७ विकेटने दणदणीत विजय झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या १५० रनच्या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाने १९ ओव्हरमध्येच केला. कर्णधार विराट कोहली हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. विराटने ५२ बॉलमध्ये नाबाद ७२ रनची खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या विजयाबरोबरच भारताने नकोशा रेकॉर्डला ब्रेक लावला आहे. भारताचा मायदेशातला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा पहिलाच विजय आहे. याआधी २०१५ साली भारतात झालेल्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा २-०ने पराभव झाला होता. त्यावेळीही एक मॅच पावसामुळे रद्द झाली होती. या सीरिजमधला धर्मशालामधला पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही.
पहिले बॉलिंग करणाऱ्या भारताने दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. दीपक चहरने सर्वाधिक २ विकेट घेतल्या, तर नवदीप सैनी, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकने सर्वाधिक ५२ रनची खेळी केली.
अर्धशतकी करणाऱ्या विराटने या मॅचमध्ये अनेक विक्रम केले. विराट आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे. विराटच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २४४१ रन झाल्या आहेत. याआधी हा विक्रम रोहितच्या नावावर होता. या मॅचनंतर आता रोहितच्या नावावर २,४३४ रन केले आहेत.
या मॅचमध्ये विराटला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये सर्वाधिकवेळा मॅन ऑफ द मॅच मिळवण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
या रेकॉर्डमध्ये विराटने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीची बरोबरी केली आहे. विराट आणि शाहिद आफ्रिदीला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ११ मॅन ऑफ द मॅच मिळाले आहेत. तर या यादीत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी पहिल्या क्रमांकावर आहे. मोहम्मद नबीला १२ वेळा मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं.
अर्धशतकी खेळीबरोबरच विराटची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली सरासरीही ५०च्या वर गेली आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरी असणारा विराट हा एकमेव खेळाडू आहे. विराटची टी-२०मध्ये ५३.१४, वनडेमध्ये ६०.३१ आणि टेस्टमध्ये ५३.१४ एवढी सरासरी आहे.