भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माचं (Rohit Sharma) भविष्य आता निवडकर्त्यांच्या हातात असल्याचं म्हटलं आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सुनील गावसकर यांनी भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीवर भाष्य केलं आहे, ज्यामध्ये न्य़ूझीलंड संघाने घऱच्या मैदानावर दिलेल्या व्हाईटवॉशचाही समावेश आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वातील निवड समितीने आता रांगेत उभ्या असणाऱ्यांना संधी देणं योग्य ठरेल असं गावसकर म्हणाले आहेत.
सध्या संघर्ष करत असलेले स्टार रोहित आणि कोहली यांच्या भवितव्यावरुन सुरु असलेल्या वादावर ते म्हणाले की, "ते किती काळ खेळू शकतील हे आता निवडकर्त्यांवर अवलंबून आहे". आता भारत WTC (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप) फायनलसाठी पात्र ठरण्यात अयशस्वी ठरला आहे, तेव्हा ते का घडले त्या कारणांवर विचार करणं उचित ठरेल".
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप सुरु झाल्यानंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा बॉर्डर-गावसकर मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून 1-3 ने पराभूत झाल्यानंतर भारत अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही. भारतीय संघाची निष्प्रभ फलंदाजी या पराभवाला कारणीभूत ठरली आहे. रोहित आणि कोहली यांच्यासह कोणीही चांगली फलंदाजी केली नाही. कोहलीने 9 डावांमध्ये 190 तर रोहित शर्माने 5 डावात फक्त 31 धावा केल्या. मालिकेत नऊ पैकी सहा वेळा भारतीय फलंदाज 200 पेक्षा जास्त धावा करण्यात अपयशी ठरले. यामुळे सुनील गावसकर यांनी भारतीय फलंदाजांवर टीका करताना शब्द राखून ठेवले नाहीत.
"हे स्पष्ट आहे की गेल्या सहा महिन्यांत, फलंदाजी अयशस्वी ठरले. आपण जे सामने जिंकण्याची गरज होती ते गमावण्याचे हेच मुख्य कारण होते. म्हणून, जर इंग्लंडमध्ये जूनच्या मध्यात सुरू होणाऱ्या WTC च्या नवीन चक्रात बदल आवश्यक असतील, त्यासाठी निवडकर्ते 2027 च्या अंतिम फेरीसाठी अजूनही कोण असतील हे विचारात घेतील आणि त्यानुसार निवड करतील," अशी अपेक्षा गावसकरांनी व्यक्त केली आहे.
सुनील गावसकर यांनी यावेळी कोणाचं नाव घेतलं नाही मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही चांगले खेळाडू समोर येत आहेत आणि त्यांना योग्य संधी देण्याची जबाबदारी आता निवडकर्त्यांवर आहे असंही म्हटलं. "जोपर्यंत त्यांना संधी दिली जात नाही तोपर्यंत रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करणारे आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करतील की नाही हे आम्हाला कसे समजेल? येथेच चांगली निवड करण्याची वेळ येते," असं ते म्हणाले.
सुनील गावसकर यांनी यावेळी नितीश कुमार रेड्डीसारख्या खेळाडूचा शोध घेतल्याबद्दल निवड समितीचं कौतुकही केलं. "नितीश कुमार रेड्डीमधील क्षमता पाहिल्याबद्दल आणि त्याला कसोटी संघात निवडल्याबद्दल अजित आगरकर आणि त्याच्या संघाचे अभिनंदन," असं ते म्हणाले.
गोलंदाजीबद्दल गावसकर म्हणाले की, जसप्रीत बुमराह सारख्या स्टारवर जास्त भार पडणार नाही याची खात्री करण्यासाठी भारताकडे पुरेशी प्रतिभा आहे ज्याला आवश्यक संधी देणे आवश्यक आहे. "भारताकडे आशादायक वेगवान गोलंदाज आहेत जे संधीची वाट पाहत आहेत. होय, बुमराहवर जास्त भार पडू नये आणि जर इतर जण पुढे आले आणि आक्रमक खेळी केली तर कोणत्याही परिस्थितीत सामने जिंकू शकतो," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच स्टार खेळाडूंना बाजूला करणं अवघड जातं. पण गावसकर म्हणाले की, जर एखादी व्यक्ती कामगिरीकडे प्रामाणिकपणे पाहण्यास सक्षम असेल तर माघार घेणं कठीण जात नाही. "आम्ही रोज आरशात आमचे चेहरे पाहतो आणि आपण हेच करत असल्याने वर्षानुवर्षे झालेले बदल आमच्या लक्षात येत नाहीत. पूर्वीचे फोटो किंवा व्हिडिओ पाहिल्यावरच ते बदल लक्षात येतात," असं ते म्हणाले.
"तेव्हाच आपण आपल्या सर्वोत्तम गोष्टींकडे पाहण्यासाठी आवश्यक ते बदल करण्याचा विचार करतो. असे करण्यासाठी, तथापि, आपल्याला पुन्हा स्वतःकडे दीर्घ प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे," असं त्यांनी अधोरेखित केलं.