मुंबई: श्रीलंकेचा ऑलराऊंडर आणि माजी कर्णधार थिसारा परेरा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. श्रीलंका क्रिकेटला (एसएलसी) पत्र पाठवताना परेरा म्हणाले की, निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे. युवा क्रिकेटर्सना आता संधी मिळणार आहे. 32 वर्षीय ऑलराऊंडर खेळाडूनं 6 टेस्ट, 166 वन डे आणि 84 टी 20 सामन्यांचं प्रतिनिधित्व केलं आहे.
परेरा हे आता वेगवेगळ्या जगभरातील फ्रांचायझीमधून क्रिकेट खेळणार आहेत.2014च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये देखील ते सहभागी झाले होते. त्यावेळी भारत आणि बंग्लादेश दोन्ही संघांना पराभूत करून श्रीलंकेला विजय मिळवून देण्यात त्यांचं योगदान मोठं होतं. त्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डानंही त्यांचं खूप कौतुक केलं होतं. परेरा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मला अभिमान आहे मी 7 क्रिकेट विश्वचषकात श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
श्रीलंका बोर्डाचे सीईओ एश्ले डी सिल्वा यांच्या म्हणण्यानुसार परेरा हे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांनी एक खेळाडू म्हणून श्रीलंका क्रिकेटमध्ये खूप योगदान दिलं आहे आणि काही महान क्षणांचा ते एक भाग आहेत.
परेरानं आपण फ्रांचायझीमधून खेळणार असल्याचं जाहीर केलं आहे. लंका प्रीमियर लीगमधून ते स्टॅलियन्ससाठी खेळतात. त्यांनी आपल्या करियरमध्ये 6 कसोटी सामने खेळले. त्यामध्ये 203 धावा केल्या आणि 11 विकेट्स देखील घेतल्या आहेत. व्हाइट बॉलमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी कायमच उत्कृष्ट राहिली आहे.