मुंबई : भारताचा कॅप्टन विराट कोहलीच्या फिटनेसबाबतच्या कडक शिस्तीचा फायदा भारतीय क्रिकेट टीमलाही होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट टीमला आता डीएनए चाचणी करावी लागू शकते. यामुळे प्रत्येक खेळाडूच्या अनुवंशिक फिटनेसबाबत माहिती मिळू शकेल. या फिटनेस चाचणीमुळे खेळाडूंची गती वाढवण्यास, लठ्ठपणा कमी करण्यास आणि मांसपेशी मजबूत करण्यास मदत मिळणार आहे. बीसीसीआयचे ट्रेनर शंकर बासू यांनी डीएनए चाचणीला सुरुवात केल्याची माहिती आहे.
खेळाडूंची डीएनए चाचणी सगळ्यात पहिले अमेरिकेच्या एनबीए(बास्केटबॉल) आणि एनएफएलमध्ये करण्यात आलं होतं. ही चाचणी करण्यासाठी बीसीसीआयला प्रत्येक खेळाडूवर २५ ते ३० हजार रुपये खर्च करावा लागत आहे. याआधी भारतीय क्रिकेट टीमची स्किनफोल्ड टेस्ट आणि त्यानंतर डेक्सा टेस्ट व्हायची.
बीसीसीआयकडून घेण्यात आलेल्या डीएनए टेस्टचा फायदा भुवनेश्वर कुमारला सगळ्यात जास्त झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु झाल्यानंतर भुवनेश्वर १९ वनडे आणि ७ टी-20 मॅच खेळला आहे. डीएनए टेस्ट केल्यानंतर भुवनेश्वरच्या फिटनेस रुटिनमध्ये बदल करण्यात आले आणि यामुळेच त्याची कामगिरी सुधारल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं.