मॅंचेस्टर : वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानचा ८९ रननी दारुण पराभव झाला. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर त्यांचा कर्णधार सरफराजवर चांगलाच संतापला. सरफराज अहमद हा बिनडोक असल्याचं शोएब म्हणाला.
'पाकिस्तानने टॉस जिंकला. टॉससोबतच अर्धी मॅच पाकिस्तानने जिंकली होती, पण टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय हा चू्कीचा होता. पावसाच्या शक्यतेमुळे पीच झाकून ठेवण्यात आली होती. त्यामुळे पीच पूर्णपणे सुखी होती. यामुळे दव जमण्याचा काही प्रश्नच नव्हता', असं वक्तव्य शोएबने केलं.
बॅटिंगसाठी सर्व परिस्थिती अनुकूल असताना फिल्डिंगचा निर्णय मूर्ख माणूसच घेईल, अशा शब्दात शोएबने सरफराजवर सडकून टीका केली.
'सरफराज इतका बिनडोक कसा असू शकतो? हेच मला समजत नाही. पाकिस्तानची बॅटिंग नाही तर बॉ़लिंग जमेची बाजू आहे. टॉस जिंकल्यामुळे अर्धा सामना पाकिस्तानने जिंकला होता. पण सरफराजने ही मॅच पराभूत होण्यासाठी प्रयत्न केले.', असा आरोप शोएबने केला.
'पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घ्यायला हवा होता. पाकिस्तानने किमान २६० रन केले असते, तरी त्यांना मॅच जिंकण्याची संधी होती. दुसऱ्या इनिंगमध्ये खेळताना आवश्यक रनरेटचा दबाव असतो. पण त्यांना समजवणार कोण? यांना सांगितलेलं समजत नाही, असं शोएब अख्तर त्याच्या युट्यूब चॅनलवरच्या व्हिडिओवर म्हणाला.
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जी चूक केली होती, त्याच चुकीची पुनरावृत्ती सरफराज अहमदने केली. विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंग करण्याची संधी दिली. पाकिस्तानने या संधीचे सोने केलं होते, ही आठवण शोएबने करून दिली.
'हसन अली वाघा बॉर्डरवर उड्या मारतो. वाघा बॉर्डवर उड्या मारण्यापेक्षा इथे आपली कामगिरी दाखवावी. हसन अलीने ८४ रनची लूट केली. तो कोणत्या मानसिकतने खेळत होता, तेच समजलं नाही. हसन अलीला फक्त टी-२० क्रिकेट खेळायचं आहे. पीएसएलमध्ये खेळण्याचीच त्याची इच्छा आहे, अशी टीका शोएबने केली.