नवी दिल्ली : भारतीय स्पोर्ट टीममधील खेळाडूंच्या अंगावर लवकरच पतंजलीचे ब्रॅन्डचे स्वदेशी बनावटीचे कपडे दिसतील, अशी जोरदार चर्चा मार्केट आणि क्रीडा चाहत्यांमध्ये रंगली आहे. पतंजली आता लवकरच अंडरगार्मेंट आणि टेक्स्टाईल क्षेत्रात उतरत असल्याची घोषणा रामदेव बाबांनी नुकतीच केली. त्यानंतर ही चर्चा रंगली आहे.
बाबा रामदेव यांची पतंजली आयुर्वेद लिमिटेड आजवर केवळ साबण, शॅम्पू, तेल, तुप आणि डाळींसह इतर घरगुती उत्पादने विकत होती. मात्र, लवकरच ही कंपनी अंडरगार्मेंट आणि टेक्स्टाईल क्षेत्रातही उतरत आहे. स्वदेशीचा नारा देत पतंजलीने आगोदरच विदेशी कंपन्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. त्यातच आता पतंजली अंडरगार्मेंट आणि टेक्स्टाईल क्षेत्रात उतरत असल्याने या कंपन्यांच्या पोटात गोळा आला तर नवल वाटायला नको.
दरम्यान, आपली उत्पादने स्वदेशी बनावटीची असल्याचा दावा करत पतंजली ग्राहकांना नेहमीच भावनीक अवाहन करते. त्यामुळे हाच धागा पकडत पतंजली आपल्या ब्रॅन्डींगसाठी भारतीय स्पोर्ट टीमचा वापर करू शकते. क्रिकेट आणि त्यासोबतच इतर खेळांकडे अलिकडील काळात भारतीय युवकांचे चांगलेच लक्ष असते. त्यामुळे युवकांना साद घालण्यासाठी स्पोर्ट्स टीमचा वापर करत पतंजली जाहीरातीचा फंडा वापरू शकते.
दरम्यान, टीम इंडिया घालणार पतंजलीचे कपडे अशी चर्चा असली तरी, बाबा रामदेव किंवा पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांच्याकडून या चर्चेबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया आलेली नाही. तसेच, भारतीय क्रीडा मंत्रालय किंवा सरकारकडूनही अशी कोणतीही प्रतिक्रीया आली नाही. मात्र, मार्केटमध्ये रामदेव बबांच्या पतंजलीच्या कपड्यांची जोरदार चर्चा आहे.