नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेट टीमने अबुधाबी येथे श्रीलंकेविरोधात खेळलेल्या वन-डे सीरिजमध्ये चांगला खेळ दाखवत विजय मिळवला. श्रीलंकेच्या टीमला सर्वच मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
पाकिस्तानच्या या विजयात मोठं योगदान बॉलर्सचं होतं. इतकचं नाही तर बॅट्समननेही चांगली बॅटींग केली. या सीरिजमधील तिसऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानी बॅट्समन इमाम उल हक याची पहिलीच वन-डे मॅच होती.
इमाम उल हक याने आपल्या पहिल्या वन-डे मॅचमध्ये सेंच्युरी लगावल्यानंतर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला. सलीम इलाही याच्यानंतर पहिल्या वन-डे मॅचमध्ये सेंच्युरी लगावणारा इमाम उल हक हा दुसरा पाकिस्तानी प्लेअर ठरला आहे.
इलाहीने १९९५मध्ये श्रीलंकेविरोधात सेंच्युरी केली होती. इमाम पाकिस्तानचा माजी क्रिकेटर इंजमाम उल हक याचा पुतण्या आहे. त्याचं पाकिस्तानी टीममध्ये सिलेक्शन झाल्यानंतर अनेकांनी टीका केली होती.
श्रीलंका विरोधात खेळलेल्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये इमामने पदार्पण केलं. या मॅचमध्ये त्याने १०० रन्सची इनिंग खेळली. ही सीरिज संपल्यानंतर इमामने एक मोठा खुलासा केला आणि तो म्हणजे त्याने सेंच्युरी लगावल्यानंतर त्याला जवळपास ३०० ते ४०० मुलींचे फोन-मेसेजेस आले.
इमामने सांगितले की, सोशल मीडियातील अकाऊंटवर मेसेजेसचा पूर आला होता. तसेच या मेसेजेसची संख्या इतकी झाली की त्याला आपला मोबाईलच बंद करावा लागला होता.